कडेगावात 74 लाख देवूनही कोतमाई ओढा अस्वच्छ का?

संतोष कणसे 
Saturday, 21 November 2020

​कडेगाव : येथील कोतमाई ओढ्याची पुन्हा डंपिंग ग्राऊंडकडे वाटचाल सुरु झाली आहे. तेव्हा नगरपंचायत प्रशासनाने 24 लाखावरुन 74 लाखांचा स्वच्छतेचा ठेका देवूनही ओढा अस्वच्छ का? असा संतप्त सवाल आता नागरिकांतून विचारला जात आहे. 

कडेगाव : येथील कोतमाई ओढ्याची पुन्हा डंपिंग ग्राऊंडकडे वाटचाल सुरु झाली आहे. तेव्हा नगरपंचायत प्रशासनाने 24 लाखावरुन 74 लाखांचा स्वच्छतेचा ठेका देवूनही ओढा अस्वच्छ का? असा संतप्त सवाल आता नागरिकांतून विचारला जात आहे. 

नगरपंचायतीने शहराच्या पश्‍चिमेला असलेल्या कोतमाई ओढ्यातच कचरा डेपो केला होता. यावरुन येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणिकराव देशमुख यांनी आवाज उठविला होता. याबाबत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने येथील कचरा डेपो इतरत्र हलविला होता. तर आता पुन्हा शहरातील मटण, चिकन व्यावसायिक व अन्य काही नागरीक कोतमाई ओढ्यात कचरा मोठ्या प्रमाणात टाकू लागले आहेत. 

त्यामुळे या ओढ्याची सध्या पुन्हा डंपिंग ग्राऊंडकडे वाटचाल सुरु झाली आहे. तर नगरपंचायत प्रशासनाने शहरांतील स्वच्छतेच्या ठेक्‍यात "मलईदार' वाढ करुन 24 लाखांचा स्वच्छतेचा ठेका तब्बल 74 लाखांवर नेवून ठेवला आहे. असे असताना संबंधित स्वच्छता ठेकेदाराकडून कधीही या कोतमाई ओढ्याची स्वच्छता केली जात नाही. तेव्हा संबंधित ठेकेदाराकडून नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ कोतमाई ओढ्याची स्वच्छता करुन घ्यावी अन्यथा हा "बहुचर्चित' स्वच्छतेचा ठेका रद्द करावा अशी मागणी नागरिकांतून जोर धरु लागली आहे. 

कोतमाई ओढ्यात जेथे सध्या कचरा टाकला जात आहे. तेथे नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेची विहीर आहे. तर वाऱ्यामुळे येथील कचरा पाणी पुरवठा विहिरीत जावून शहरात पुन्हा विविध साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे. तर येथे कचरा टाकणाऱ्यावर नगरपंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी अशीही नागरिकांची मागणी आहे. तसेच ओढ्याची नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छता ठेकेदाराकडून तात्काळ स्वच्छता करुन घ्यावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरु लागली आहे. 

कुत्र्यांचाही बंदोबस्त करावा 
येथील मटण व चिकन व्यावसायिक कोतमाई ओढ्यात कचरा टाकत असल्याने येथे मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला आहे.मोकाट कुत्र्यामुळे कडेगाव-शामगाव मार्गावरुन प्रवास करणाऱ्या दुचाकी व शहरातील येथून पायी जाणाऱ्या नागरिकांना श्वान दंशाचा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे येथील व शहरांतील मोकाट कुत्र्यांचाही नगरपंचायत प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is Kotmai Odha unclean even after paying Rs 74 lakh in Kadegaon?