इस्लामपुरात साकारतेय कोव्हिड सेंटर; अजिंक्‍यन्स ग्रुपने केली मदत ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

इस्लामपूर (सांगली) : शहरात कोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे तीनशे बेडची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या कामेरी रस्त्यावरील ज्या ठिकाणी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे त्याच ठिकाणी शेजारी असलेल्या मुलींच्या वसतिगृहात हे केंद्र सुरू होत आहे.

इस्लामपूर (सांगली) : शहरात कोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे तीनशे बेडची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या कामेरी रस्त्यावरील ज्या ठिकाणी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे त्याच ठिकाणी शेजारी असलेल्या मुलींच्या वसतिगृहात हे केंद्र सुरू होत आहे.

उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांनी ही माहिती दिली. आज या कामाला सातारा सैनिक स्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सुरुवात केली. या केंद्राच्या उभारणीला आवश्‍यक असणारे साहित्य देऊन त्यांनी या उपक्रमात योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील उपस्थित होते. 

सध्या सर्वत्र कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव सुरू असून त्याला रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू आहेत. पहिल्याच टप्प्यात मार्च महिन्यात इस्लामपूर शहराने कोरोनाचा कहर अनुभवला असल्याने प्रशासनाने आधीपासूनच योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्या अनुषंगाने कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका विचारात घेऊन शहराच्या बाहेर कोरोना केंद्र सुरू होत आहे.

या केंद्राला पहिली मदत देण्याचा मान सातारा सैनिक स्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी मिळवला आहे. वाळवा-शिराळाचे उपविभागीय अधिकारी नागेश पाटील हेदेखील या स्कुलचे माजी विद्यार्थी आहेत. या माजी विद्यार्थ्यांचा एक 'अजिंक्‍यन्स' नावाने व्हाट्‌सअप्प ग्रुप सक्रिय आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मदत करण्याची चर्चा या ग्रुपवर सुरू असताना कोव्हिड सेंटरला मदत देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. इस्लामपूर शहरातील 20 ते 22 जणांनी मिळून रक्कम जमवली आणि त्यातून या कोव्हिड केंद्रासाठी पन्नास गाद्या आणि पन्नास उशा भेट स्वरूपात दिल्या. 

नागेश पाटील म्हणाले, ""सध्या निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत लोकसहभागातून एक चांगले काम उभा राहिल्याचे समाधान आहे. या स्थितीत सर्वांनी मिळून उपाययोजना आणि त्याला सहकार्य केल्यास धोका टळेल.'' यावेळी सातारा सैनिक स्कुलचे माजी विद्यार्थी बाळासाहेब पाटील, प्रदीप यादव, राजेंद्र यादव, विलास पाटील, प्रकाश चौगुले, जयसिंग पाटील, सदाशिव पाटील, चंद्रकांत गायकवाड, शिवाजी शिंगाडे, श्रीराम पाटील, महेश झेंडे, शौकतअली, डॉ. सदानंद जोशी, तानाजी शेळके, नंदकुमार पाटील, बाळासाहेब जाधव, शिवाजी पाटील, डॉ. दिलीप पाटील उपस्थित होते. 

सध्याच्या अडचणीच्या काळात आपणाला काय भरीव मदत करता येईल या कल्पनेतून ही मदत दिली आहे. याव्यतिरिक्त आणखी मदत उपलब्ध करून देणार आहोत.
- डॉ. सदानंद जोशी, अजिंक्‍यन्स ग्रुप इस्लामपूर. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kovid Center in Islampur; Ajinkyans Group helped!