सांगलीत पुढील आठवड्यात शंभर बेडचे कोविड हॉस्पिटल 

अजित झळके 
Wednesday, 9 September 2020

जिल्हा क्रीडा संकुल येथील शंभर बेडचे कोविड हॉस्पिटल पुढील आठवड्यात सुरू होत आहे.

सांगली : जिल्हा क्रीडा संकुल येथील शंभर बेडचे कोविड हॉस्पिटल पुढील आठवड्यात सुरू होत आहे. तसचे तालुक्‍याच्या ठिकाणी कोविड उपचार केंद्रे वाढविण्यात येत यश येत असून इस्लामपूर, शिराळा, कोकरूड, आष्टा, विटा, जत आणि कवठेमहांकाळ येथे आता रुग्णांची सुविधा केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

डॉ. चौधरी म्हणाले, ""यंत्रणा उभारणी करणे तसे सोपे आहे, मात्र डॉक्‍टर व अन्य कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. महापालिका क्षेत्रातील शिक्षकांना यात सामावून घेण्याबाबत विचार सुरु आहे. बाहेरून डॉक्‍टर मागवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या सर्व अडचणींवर मात करत क्रीडा संकुल येथील 100 बेडचे रुग्णालय आता अंतिम टप्यात असून पुढील आठवड्यात जनतेसाठी उपलब्ध करून देत आहोत. याशिवाय जत येथे तीन रुग्णालयात मिळून 125 बेडची सुविध केलेली आहे. कवठेमहांकाळ येथे 40, तासगाव येथे तीन रुग्णालयात मिळून 110, आष्टा येथे 50, विटा व इस्लामपूर येथे अनुक्रमे तीन व चार हास्पिटल मध्ये कोविड उपचार सुरू केले आहेत. त्यामुळे आता सांगली-मिरजेवरील ताण कमी येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. 

जे हॉस्पिटल सुरू करणार आहेत. त्यांना आम्ही परवानगी देताना कोठेही अडवत नाही. फक्‍त नियमानुसार सर्व असले पाहिजे. सांगलीत आयएमएच्या मदतीने प्राईड या हॉटेलचेच रुग्णालयात रुपांतर केले आहे. असे आणखी प्रस्ताव आल्यास मंजुरी दिली जाईल. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या हॉस्पिटलचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही मात्र कोणीही हॉस्पिटल उभा करत असेल तर आपण परवानगी देवू मात्र वैद्याकीय कर्मचारी त्यांनीच उपलब्ध करायचे आहेत, असे त्यांनी नमुद केले.'' 

ते म्हणाले, ""ज्या रुग्णांना तीव्र लक्षणे नाहीत, मात्र बेड अडवून ठेवले आहेत, त्यांची माहिती घेणे सुरु आहे. त्याबाबत आराखडा सुरु आहे. ज्यांना खरच खूप गरज आहे, अत्यवस्थ आहेत, अशांना बेड मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी जनतेने आणि डॉक्‍टरांनी मदत करावी. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच राहून उपचार घ्यावेत. एक जीव वाचवण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. ऑक्‍सिजन बाबत ते म्हणाले, ऑक्‍सिजन पुरवठा सध्या चांगला आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.'' 

एचआरसीटीचा गैरवापर टाळा 
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, ""कोरोना बाधित प्रत्येक रुग्ण छातीचा सीटीस्कॅन (एचआरसीटी) करायला जात आहे, मात्र याची आवश्‍यकता नाही. ही चुकीची पद्धत शहरात दिसत आहे. डॉक्‍टरांचे आदेश नसतानाही लोक हे करून घेत आहेत. काही ठिकाणी गरज नसताना ते करायला लावले जात आहे. नाहक भिती निर्माण करू नये. याचा गैरवापर टाळावा. ऑक्‍सिजन लेव्हल 90 पेक्षा कमी झाली तरच धोका वाढतो, हे लक्षात घ्या. घाबरून अन्य चाचण्या करू नयेत. अन्यथा कारवाई करावी लागेल.'' 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kovid Hospital with 100 beds next week in Sangli