पलूस तालुक्‍यात लवकरच 50 बेडचे कोविड हॉस्पिटल 

संजय गणेशकर
Tuesday, 8 September 2020

पलूस येथे लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात 50 बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत पलूस येथे झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. 

पलूस : पलूस तालुक्‍यातील वाढती कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेऊन पलूस येथे लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात 50 बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत पलूस येथे झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. 
पलूस, कडेगाव तालुक्‍यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पलूस येथे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रांताधिकारी गणेश मरकड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सौ. रागिणी पवार, जिल्हा बॅंकेचे संचालक महेंद्र लाड व इतर अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी मंत्री डॉ. कदम यांनी तालुक्‍यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. सद्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना तात्काळ बेडची उपलब्धता करुन देऊन आवश्‍यक रुग्णांना ऑक्‍सिजनचा पुरवठा होणे अत्यावश्‍यक आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सर्व ते उपचार वेळेत होणे गरजेचे आहे. सद्या पलूस ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना आँक्‍सिजनचा पुरवठा केला जातो. मात्र, याठिकाणी फक्त 25 बेडचीच व्यवस्था आहे. 

पलूस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलिंचे वसतीगृहामध्ये सद्या कोविड केअर सेंटर आहे. त्याठिकाणी सद्या क्वारंटाईन असलेल्या व दक्षता म्हणून दाखल केलेल्या रुग्ण व नागरिकांना पलूस येथील ल. कि. विद्यामंदिरच्या संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविण्यात येऊन, मुलिंचे वसतीगृहात कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याठिकाणी 50 बेडची व्यवस्था असून याठिकाणी ग्रामीण रुग्णालयाप्रमाणे आँक्‍सिजन देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या काही दिवसात हे रुग्णालय सुरू होईल. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kovid Hospital with 50 beds soon in Palus taluka