आठ दिवसांत वाहिले ‘आख्खे कोयना धरण’!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
कोयना १०३.४२, धोम १०.४९, धोम-बलकवडी ३.५७, कण्हेर ८.६१, उरमोडी ९.१९, तारळी ५.११, नीरा-देवघर १०.३०, भाटघर २३.२५, वीर ९.०९.

सातारा - पूर्वेकडे दुष्काळाशी सामना करणारा माण, खटाव तालुका आणि पश्‍चिमेकडे अतिवृष्टीमुळे पुराशी दोन हात करणारे कऱ्हाड, पाटण तालुके अशा दुहेरी संकटात सातारा जिल्हा अडकला आहे. जिथं पिकतं तिथं विकत नाही..असे म्हणतात, ते पाण्याच्या बाबतीतही खरे ठरले आहे.

पूरपरिस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख धरणांतून तब्बल ९८ टीएमसी पाणी वाहून गेले. एकट्या कोयना धरणाची साठवण क्षमता १०५ टीएमसी आहे. म्हणजेच जिल्ह्यातील सर्व धरणांतून केवळ आठ दिवसांत आख्खे कोयना धरण वाहून गेले, असे म्हणता येते. या कालावधीत कोयनेतून ४६, तर इतर धरणांतून ५२ टीएमसी पाण्याचा समावेश आहे.

यावर्षी पावसाने सर्व वर्षांच्या सरासरीचे ‘रेकॉर्ड’ मोडले. जुलैमध्ये सुरू झालेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यातच सरासरीचे विक्रम मोडले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत १४ हजार ९२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरी ११६५.९४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरीच्या १७९.०३ टक्के तर वर्षिक सरासरीच्या ११२.०७ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाने यावर्षी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांतच सरासरीचे सर्व ‘रेकॉर्ड’ मोडले आहेत. 

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणी नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे सर्वच नद्या पूररेषेच्यावर वाहू लागल्या. याचा फटका पाटण, कऱ्हाड, सातारा, वाई तालुक्‍यांना बसला. जिल्हा प्रशासन पूर्वेकडील माण, खटाव आणि फलटण तालुक्‍यांत दुष्काळी परिस्थितीशी तोंड देत होते. तर पावसाळ्यात पश्‍चिमेकडील कऱ्हाड, पाटण, सातारा, वाई, जावळी, महाबळेश्‍वर तालुक्‍यांत अतिवृष्टीशी सामना करावा लागला. एकीकडे अतिवृष्टी होत असताना पूर्वेकडील तालुके दुष्काळाचे चटके सहन करत होते. कोयना धरणातून पूरपरिस्थितीच्या काळात साधारण ४६ टीएमसी पाणी वाहून गेले. तसेच वीर धरणातून ४५, तारळीतून सहा तर इतर धरणांतून दहा टीएमसी असे एकूण ९८ टीएमसी पाणी वाहून गेले. हे पाणी दुष्काळी भागाला कालव्याव्दारे सोडता आले असते. मात्र, कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने आणि काही ठिकाणी पाणी उचलून पुढे टाकण्यासाठी असलेल्या पंपगृहांची दुरुस्ती सुरू असल्याने पाणी दुष्काळी भागाला देता आले नाही. केवळ कण्हेर धरणातून कालव्याव्दारे पाणी माण तालुक्‍यामध्ये देण्यात आले होते. 

तालुकानिहाय झालेला पाऊस
आजचा व कंसात आजअखेर झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) - सातारा २३.३८ (१५८३.३९), जावळी ४०.८० (२००२.०३), पाटण ४०.७३ (१७६८.०३), कऱ्हाड १४.३८(९२७), कोरेगाव ५.२२ (६२९), खटाव ६.८८ (३९९.१७), माण ०.८६ (१५५.१३), फलटण ० (१८५.५६), खंडाळा ८.५० (४९५.७५), महाबळेश्‍वर ७५.६३ (५९४९.६६). आजपर्यंत एकूण १४ हजार ९९२ मिलिमीटर, तर सरासरी ११६५.९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koyana Dam Water Release Flood