esakal | कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचे रणांगण तापू लागले
sakal

बोलून बातमी शोधा

Krishna sugar factory elections started heating up...

कऱ्हाड तालुक्‍यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे.

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचे रणांगण तापू लागले

sakal_logo
By
विजय लोहार

नेर्ले : कऱ्हाड तालुक्‍यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. संचालकपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्याशी चर्चा सुरू केल्या आहेत. भेटीगाठी व बैठका सुरू झाल्या आहेत. जेवणावळी झडू लागल्या आहेत. 

गेल्या निवडणुकीत भोसले गटाने बाजी मारत कृष्णा कारखान्यात आपली सत्ता आणली होती. कृष्णा कारखान्याच्या निवडणुका चार ते पाच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. कृष्णा कारखान्यात डायरेक्‍टर म्हणून जाण्यास "इंटरेस्टेड' असलेल्यानी राजकीय चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. दुरंगी, तिरंगी, की चौरंगी लढत होईल अशी चर्चा आहे. इच्छुकांच्या मांदियाळीने कृष्णाकाठ गजबजला आहे. 

कृष्णा कारखाना कायम निवडणुकीच्या रंगात रंगला. एकमेकांवरील टीकेने गाजतो. एकमेकांना डिवचल्याशिवाय निवडणुक पूर्णच होत नाही. हा इतिहास आहे. 
कृष्णा कारखाना म्हटले, की सातारा आणि सांगली जिल्ह्याचा राजकीय आणि लोकांना जोडणारा दुवा आहे. सांगली, साताऱ्याची राजकारणाची पाळंमुळं कृष्णा कारखान्यात आहे. ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते व कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार जयवंतराव भोसले यांच्या गटात कायम कमालीचा संघर्ष व लढाई ठरलेली. सन 1979 नंतर सन 2007 पर्यंत हा संघर्ष टोकाला गेला होता. हे सभासदांनी अनुभवले आहे. एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंतच्या घटना कारखान्याच्या निवडणुकीत घडल्या होत्या. सन 2007 मध्ये माजी अध्यक्ष मदनराव मोहिते व भोसले कुटुंबाचे राजकीय मिलन झाले.

कृष्णा कारखान्याचे राजकारण बदलले. कराड तालुक्‍यातदेखील याचे पडसाद उमटले. सन 2010 मध्ये कृष्णा कारखान्याचे संस्थापक सदस्य आबासाहेब मोहिते यांचे नातू अविनाश मोहिते यांनी त्यात उडी घेतली. आबासाहेब मोहितेंवर कसा अन्याय झाला याचा पाढाच सभासदांसमोर मांडला. सभासदांच्या भावनेला हात घालत कृष्णा कारखान्यात कधी नव्हे तो बदल झाला. अविनाश मोहिते यांच्या गटाला सत्ता मिळाली. आता अविनाश मोहिते यांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या कारभाराबाबत उट्टे काढायला सुरुवात केली आहे. सातारा, सांगली जिल्ह्यातील कृष्णाचे सभासद पूर्वीच्या संचालक व नवीन कार्यकर्त्यांची भेटीगाठीत व्यस्त आहेत. 

अविनाश मोहिते यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आपण आहोतच, अशी भूमिका मांडली आहे. कृष्णाचे कार्यक्षेत्र कराड, वाळवा, खानापूर ,कडेगाव या तालुक्‍यांत आहेत. 48 हजार सभासद आहेत. 

सांगली व साताऱ्याच्या सीमेवर असणाऱ्या कारखान्यात सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. आजी - माजी संचालक पार्टी प्रमुखांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. कृष्णा कारखान्याचे निवडणुक धुरळा उडवणार हे नक्की. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिका महत्वाच्या ठरणार आहेत. 

पवारसाहेबांची भूमिका 
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अविनाश मोहिते यांनी श्री. पवार मदत करतील अशी अपेक्षा पत्रकार परिषदेत व्यक्त केली. त्यावर डॉ. मोहिते व तुम्ही एकत्र येणार का? या प्रश्नावर त्यांनी पवारसाहेब सांगतील तो निर्णय मान्य करू, असे सूचक विधान केले आहे. 

मातब्बरांची गर्दी 

कृष्ण कारखान्याच्या निवडणूकीत सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, कऱ्हाडचे मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, आमदार मानसिंग नाईक, पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, गटनेते राहुल व युवा नेते सम्राट महाडिक, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. 

loading image