कुरुंदवाड : सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम अपयशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीन बीजोत्पादन

कुरुंदवाड : सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम अपयशी

कुरुंदवाड: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे (महाबीज) शिरोळ तालुक्यात ७०० हेक्टरमध्ये राबविलेला सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम अपेक्षित उत्पादन न झाल्याने अपयशी ठरला आहे. शेतकऱ्यांना २५ ते ३० कोटींचा आर्थिक फटका बसला आहे. बियाणे वाटप करताना महाबीजने उत्पादन व बाजारभावापेक्षा २५ टक्के जादा दराचा गाजावाजा केला; मात्र उत्पादन मिळाले नाही आणि वाढीव दरही मिळाला नसल्याचे चित्र आहे.

सैनिक टाकळी येथील रामेश्वर सोयाबीन खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील व शिवसृष्टी अॅग्रो व पूरक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव पाटील यांनी महाबीजचे कार्यकारी संचालक यांच्याकडे तक्रार करत नुकसानभरपाईची मागणी केली आहे. शिरोळ तालुका ऊसपट्टा असला तरी सोयाबीन उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण तालुका आहे. येथील शेतकऱ्यांनी एकरी १७ क्विंटलपर्यंतचे विक्रमी उत्पन्न घेतले होते. त्यामुळे यंदा महाबीजने बीजोत्पादनासाठी शिरोळ तालुका निवडला व सुमारे २ हजार एकरांवर जे.एस ७२६ वाणाचे बियाणे वाटप केले. कृषी विभागाच्या मदतीने गावागावांत बियाणे वाटप झाले. नोंदणी व तपासणी शुल्कापोटी प्रत्येक शेतकऱ्याकडून शुल्क आकारले. महाबीजने एकरी १२ ते १५ क्विंटल सोयाबीन उत्पादन निघेल व बाजारभावापेक्षा २५ टक्के जादा दराने सोयाबीन घेऊ असे शेतकऱ्यांना सांगितले. त्यासाठी बैठकाही घेतल्या. शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा केला. पीक तरारुन आले. फुलोरा आला; पण शेंगा व दाणेच भरले नाहीत. महाबीजचे लोकही येईनात. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. विविध औषधांचा मारा फवारा केला. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. पिकाची मळणी झाली तर ३ ते ५ क्विंटलचा उतारा पडला. उत्पादन खर्चाचाही ताळमेळ बसला नाही.

दरम्यान, गावोगावी तक्रारी सुरू झाल्या. महाबीजच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले. यंदा तापमान वाढीमुळे सोयाबीनला फटका बसल्याचे जुजबी उत्तर शेतकऱ्यांना मिळाले. महाबीजने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून भरीव नुकसानभरपाई द्यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा हरिश्चंद्र पाटील यांनी दिला.

यंदा तापमानवाढीचा जबर तडाखा सोयाबीनला बसल्याने उत्पादनात घट आली आहे. अपवाद वगळता महाबीजसह विविध कंपन्यांचे वाण यंदाच्या तापमानवाढीचा ताण सहन करू शकले नसल्याचे निदर्शनास आले आहे. महाबीज व कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोव्हेंबरपासून सोयाबीन बीजोत्पादनासाठी मेहनत घेतली. २ हजारांवर एकरात पेरा झाला; पण उत्पादन निघालं नाही. केवळ १५० क्विंटल सोयाबीन महाबीजकडं आले, याचे दु:ख आहे. गतवर्षी याच वाणापासून १५ क्विंटल उत्पादन मिळाले होते. तक्रारी आल्या आहेत. कृषी विद्यापीठाकडून कारणमिमांसा होईल.

नासीर इनामदार, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज कोल्हापूर

Web Title: Kurundwad Soybean Seed Production Program Fails

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top