
पोहाळे तर्फ आळते (कोल्हापूर) - येथील श्रीमती कासाबाई तुकाराम मोरे या महिलेने ३० वर्षांपूर्वी आपल्या घरामध्ये चिरमुरे, राजगिऱ्याचे हे लाडू करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता २५-३० वर्षांत हाच लाडू गावातील चर्मकार समाज करू लागला आणि लाडूच या समाजाचा उदरनिर्वाह बनला. हा लाडू श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर, करवीरनिवासिनी महालक्ष्मी, संत बाळूमामा आदमापूर, मार्लेश्वर, गणपतीपुळे या मंदिरांत प्रसाद म्हणून जाऊ लागला. या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. चर्मकार समाजाची २५-३० कुटुंबं आहेत. त्यातील बहुतांशी कुटुंबीय व्यवसायाकडे वळले आहेत. केवळ कासाआजींमुळे हा लाडू व्यवसाय प्रसिद्धीच्या झोतात आला.
कोल्हापुरी गुळामुळे लाडू फार चवदार
कासाआजीने घरी थोडे चिरमुरे, राजगिरे आणून लाडू करण्यास सुरुवात केली व त्याची विक्री गावोगावी करण्यास सुरुवात केली. या लाडवाची चव अनेकांच्या तोंडात बसली. हा लाडू लहान मुलांना, वयोवृद्धांना हवाहवासा वाटू लागला. हे लाडू करण्याचे काम कासाआजीने हळूहळू वाढवले. बांबूची पाटी (बांबूची डोली) घेऊन ती दारोदारी फिरू लागली व आपला लाडू विकू लागली
आणि तिने या लाडूवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला .
कासाआजीचा कित्ता चर्मकार समाजातील अनेकांनी घेऊन आपणही व्यवसाय सुरू केला. या समाजातील ९० टक्के लोक लाडू व्यवसाय करतात, तर इतर १० टक्के लोक शेती, नोकरी करतात. आता हा लाडू सांगली, कोकण या भागात घरोघरी पोचला आहे. या लाडूमुळेच पोहाळे गावचे नाव नावारूपास आले आहे. स्वच्छता, नीटनेटकेपणा, चांगल्या चवीमुळे पोहाळेतील लाडवास मागणी आहे. पुणे, मुंबईचे भाविक जोतिबा डोंगरावर आल्यावर हा लाडू मोठ्या प्रमाणात घरी घेऊन जातात. कोल्हापुरी गुळामुळे लाडू फार चवदार लागतो, म्हणून त्यास मोठी मागणी आहे.
कासाबाई मोरे तथा कासाआजी या सध्या नव्वदीत पोचल्या आहेत. वयामुळे स्मरणशक्ती कमी झाली तरीही या वयात पेलेल तसे लाडू करण्याचे काम त्या आजही करतात. आजीला हा व्यवसाय सुरू करताना सुरुवातीला फार त्रास झाला; पण आजी सर्वांना पुरून उरली आणि तिने लाडवाबरोबर गावचे नावही उज्ज्वल केले.
आमच्या आजी कासाबाई यांनी प्रथम लाडवाची निर्मिती केली आणि हा लाडू व्यवसाय पोहाळेत सुरू झाला. यावरच आमचे कुटुंब जगते. तोच आमच्या जीवनाचा आधार आहे.
- सौ. पूजा मोरे, कासाआजींची नातसून
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.