लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे वाईत निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yamunabai waikar

लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे वाईत निधन

सातारा: लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर (वय 103) यांचे वाई येथे आज (मंगळवार) निधन झाले. यमुनाबाई यांना सोमवारी (ता. 14) रात्री वाईतील घोटवडेकर रुग्णालयात दाखल केले होते. आज (मंगळवार) दुपारी साडे बारा वाजता त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. कृष्णाकाठच्या या कलासाधिकेने सारं आयुष्य कलेसाठीच अर्पण केलं.

31 डिसेंबर 1915 रोजी यमुनाबाई वाईकर यांचा जन्म वाई (जि. सातारा) येथील कोल्हाटी समाजात झाला. आयुष्याच्या मार्गातील अनेक खडतर प्रसंगाना सामोरे जात त्यांनी स्वतःच्या कलेने, लावणीस सम्राज्ञीपदावर पोहचवले. कलेबरोबरच गावाला, समाजाला आणि याच वाटेने चालणाऱ्या असंख्य कलाकारांना आनंदाचे वाटेकरी केले. यमुनाबाईंनी कोल्हाटी-डोंबारी समाजास केंद्रशासनाच्या दप्तरी अत्यंत गौरवाचे स्थान मिळवून दिले. महाराची पोर नाटक बघावयास साने गुरुजी आले होते. या प्रयोगाचे सर्व उत्पन्न यमुनाबाईंनी गुरुजींच्या समाजकार्याला दिले. त्यांच्या या तमाशाफडात दडलेले नाट्य आणि संगीत गावोगावच्या रसिकांना अनुभवायला मिळाले आहे. त्यांच्या निधनाने पारंपारिक लावणी जपणाऱ्या कलावंतास देश मुकला आहे.

यमुनाबाईंना मिळालेले काही पुरस्कार

  • मध्य प्रदेश शासनाचा राष्ट्रीय देवी अहिल्या सन्मान.
  • यमुनाबाईंना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार.
  • संगीत नाट्य अकादमीचा रवींद्रनाथ टागोर रत्न पुरस्कार.
  • संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार.
  • साताऱ्यातील रा.ना.गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकांतर्फे देण्यात येणारा साताराभूषण पुरस्कार.
  • संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार.

परिचय:
यमुनाबाई वाईकर (जन्म: 31 डिसेंबर 1915) या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी गायिका आहेत. त्यांना लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखले जाते. त्यांचे मूळ नाव यमुना विक्रम जावळे. त्या रहात असलेली वाईची ही कोल्हाटी समाजाची वस्ती म्हणजे एक लोककलेचे माहेरच होते. यमुना, तारा, हिरा या तीन बहिणी. आईचे नाव गीताबाई. त्याही गायच्या. यमुनाबाई दहा वर्षाच्या असतानाच आपल्या दोन लहान बहिणींना घेऊन गावोगाव तमाशाच्या फडाबरोबर हिंडू लागल्या. रंगू-गंगू सातारकर यांच्याकडे त्यांना तमाशातले गाणे आणि अभिनयाची अदाकारी याचे धडे मिळत राहिले.
पुणे, मुंबई, नाशिक, बार्शी, सोलापूर, पंढरपूर, नागपूर ते थेट बेळगाव आणि कोकण असा सारा उभा-आडवा महाराष्ट्र यमुनाबाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पालथा घातला आहे. त्यांच्या या तमाशाफडात दडलेले नाट्य आणि संगीत गावोगावच्या रसिकांना अनुभवायला मिळाले आहे. कासू-वारू आणि यमुना-हिरा-तारा-वाईकर असे एकेकाळचे गाजलेले फड होते.

अभिनय हा अंगभूत गुण असल्याने लोकनाट्यातून यमुनाबाई नाटकांकडे वळल्या. त्यांनी भावबंधन, मानापमान आदी संगीत नाटके सादर केली. त्यांची संशय कल्लोळ नाटकातली भूमिका नाट्यवेड्या रसिकांच्या खास पसंतीस उतरली होती. त्यांनी धर्मवीर संभाजी, हित्यांची मंजुळा आणि महाराची पोर या अन्य नाटकांमध्ये भूमिका केल्या. महाराची पोर हे नाटक बघावयास साने गुरुजी आले होते. या प्रयोगाचे सर्व उत्पन्न यमुनाबाईंनी गुरुजींच्या समाज कार्याला दिले.

गावागावांतून पोटासाठी कलाप्रदर्शन करणाऱ्या आपल्या कोल्हाटी समाजाला स्थैर्य यायला हवे याची जाणीव यमुनाबाईंना सतत सतावत राहिली. वाईच्या मध्यभागातली आणि कृष्णातीरावरची पाले उठली पाहिजेत, आपल्या समाजबांधवांना भिंतींचे घर हवे असे विचार मनात येत राहिले. आणि यमुनाबाई वाईकरांनी समाजासाठी हौसिंग सोसायटी निर्माण केली. पोटासाठी भीक मागणाऱ्या आणि रस्तो-रस्ती-गल्ली-बोळांत गाण्यांची तान मारत हिंडत राहिलेल्या आपल्या भगिनींना यमुनाबाईंनी घरे दिली. यमुनाबाई वाईकर यांचे पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथील प्रभाकर ओव्हळ यांनी लिहिलेले लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर या नावाने चरित्र, कोल्हापूरच्या पारस प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाचा मुंबई विद्यापीठाने एम.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे.

Web Title: Lavani Samradni Yamunabai Waikar Passes Away

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top