
सांगली : विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसारच परवानाधारक व्यापाऱ्यांना भाडेपट्टयाने जागा दिली आहे.
सांगली : विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसारच परवानाधारक व्यापाऱ्यांना भाडेपट्टयाने जागा दिली आहे. तेथे तात्पुरते शेड उभारून व्यापार सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात भरच पडणार असल्याची माहिती सभापती दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेने फळमार्केटच्या जागेत बेकायदापणे गाळे बांधण्याचा घाट सुरू असल्याचा आरोप नुकतेच केला आहे. त्याबाबत खुलासा करताना सभापती श्री. पाटील म्हणाले,""फळ मार्केटमध्ये दहा गुंठे जागा कोल्ड स्टोअरेजसाठी आरक्षित आहे. उर्वरित जागेत 53 गाळे धारकांना 15 बाय 20 अशी तीनशे चौरस फुटांची जागा भाडेपट्टयाने 11 वर्षे कराराने दिली आहे.
ही जागा परवानाधारक व्यापाऱ्यांनी मागणी केल्यानंतर पणनमंत्री श्री. पाटील यांच्या आदेशानुसारच दिली आहे. फळ मार्केटने केवळ जागा भाडेपट्टेने दिली आहे. तेथे परवानाधारकांनी एकत्रित येऊन नियोजित जागेत शेड उभारले आहे. त्यासाठी बाजार समितीला प्रत्येकाकडून प्रति महिना पाचशे रुपये भाडे मिळणार आहे. तसेच त्यांची 50 हजार रुपये प्रमाणे अनामत रक्कम समितीकडे जमा आहे.''
ते पुढे म्हणाले,""शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप खोटे आहेत. कोणतेही गाळे समितीने बांधले नाहीत. केवळ जागा भाड्याने दिली आहे. 53 परवानाधारकांमुळे भविष्यात फळ मार्केटमधील व्यापार वाढणारच आहे. शिवाय सेस मधून समितीचे उत्पन्न वाढणार आहे. गाळ्यासाठी जागा देण्यापूर्वी पणन विभागाकडे ले-आऊट सादर करून परवानगी घेतली आहे. नियमानुसारच केवळ जागा कराराने दिली आहे. त्यामध्ये कोणताही चुकीचा प्रकार घडला नाही.''
संपादन : प्रफुल्ल सुतार