
महामार्ग रस्ते कामासाठी मुरूम-माती नेणाऱ्या डंपरमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बेडग ग्रामपंचायतीचे सदस्य उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गाचे वाहतूक करणारे डंपर अडवून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
आरग : महामार्ग रस्ते कामासाठी मुरूम-माती नेणाऱ्या डंपरमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बेडग ग्रामपंचायतीचे सदस्य उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गाचे वाहतूक करणारे डंपर अडवून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गाव सोडून पर्यायी रस्ता निवडून वाहतूक करावी, असे ठेकेदारला त्यांनी सुनावले.
मिरज पूर्व भागात सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या मुरूम-मातीची वाहतूक बेडग-मंगसुळी रोडवरून सुरू आहे. बेडग गावातील मुख्य अंतर्गत रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचा मोठा त्रास ग्रामस्थांना होत असून, रस्त्यावर धूळ उडत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास होत असून रस्त्यावर पाणी फवारण्याची मागणी नागरिकांनी केली होती; मात्र संबंधित ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले. या डंपरच्या धुरळ्यामुळे शेतीमालाचीही वाट लागली आहे. रस्त्यालगतच्या बागेवर धुरळा पडल्याने व्यापारी शेतकऱ्यांचा माल कवडीमोल झाला आहे.
बेडग-मंगसुळी रोड हा आधीच अरूंद व खराब आहे. शिवाय हा रस्ता पंधरा टन वाहतुकीसाठी आहे; मात्र पन्नास-साठ टनांपर्यंत अवजड वाहतूक या रस्त्यावर होत आहे. तीन वेळा या डंपरमुळे अपघातही झाले आहेत. बेडग ग्रामपंचायतीने ही वाहतूक बंद करावी यासाठी पोलिस विभाग, आरटीओ, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनाही निवेदनही दिले आहे; मात्र त्याचा काहीच परिणाम होत नसल्याने उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी डंपर अडवून तीव्र संताप व्यक्त केला. तसेच बेडग गाव सोडून पर्यायी रस्ता निवडून वाहतूक करावी, असे ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना सुनावले.
संपादन : प्रफुल्ल सुतार