पूर येण्याआधी घरे सोडा, सील करायला लावू नका 

अजित झळके 
Monday, 17 August 2020

कृष्णा नदीला पूर येण्याआधी जामवाडी, सूर्यवंशी प्लॉटसह नदीकाठच्या भागातील लोकांनी घर सोडावे. त्यांना प्रशासनाला सहकार्य केले नाही, तर घरे सील करावी लागतील, असा इशारा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला. 

सांगली : कृष्णा नदीला पूर येण्याआधी जामवाडी, सूर्यवंशी प्लॉटसह नदीकाठच्या भागातील लोकांनी घर सोडावे. त्यांना प्रशासनाला सहकार्य केले नाही, तर घरे सील करावी लागतील, असा इशारा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला. 

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे. पुढील पाच दिवसांत कोयना धरण क्षेत्रात अतिवृष्टीची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. साहजिकच, कोयनेतून विसर्ग वाढवावा लागणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या काही भागांत धोका पातळीच्या आधीच पाणी येते. तेथे लोकांनी वेळीच घरे सोडली पाहिजेत, त्यासाठी कापडणीस यांनी आज जामवाडी सूर्यवंशी प्लॉटची पाहणी केली. 

महापालिकेने तातडीने तीन हजार नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी 29 फूट होताच खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी दिली. कृष्णा नदीला होणारी 37 फुटांची संभाव्य पाणीपातळी गृहीत धरत मनपाकडून ज्या भागात पाणी येण्यास सुरवात होते. त्या भागात लोकांना सुरक्षित स्थळी निघण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या पार्श्वभूमीवर कापडणीस यांनी जामवाडी, सूर्यवंशी प्लॉटची पाहणी करत नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी वेळीच स्थलांतरीत व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, सहायक आयुक्त सहदेव कावडे, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे उपस्थित होते. 

 
संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leave homes before flooding, do not seal