बांबर डोंगर परिसरात बिबट्याचा हल्ला; दोन जनावरे ठार 

भगवान शेवडे
Saturday, 6 February 2021

मांगले येथील बांबर डोंगर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एक रेडी व एक कालवड अशी दोन पाळीव जनावरे ठार झाल्याची घटना आज पहाटे निदर्शनास आली.

मांगले : मांगले येथील बांबर डोंगर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एक रेडी व एक कालवड अशी दोन पाळीव जनावरे ठार झाल्याची घटना आज पहाटे निदर्शनास आली.

येथील बांबर परिसरातील तानाजी आबा चरापले यांच्या शेतातील शेडमध्ये घुसून बिबट्याने हा हल्ला केला. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने मांगले परिसरातील गावातील लोकांच्या सह पंचक्रोशीतील लोकांनी केली आहे. 

मांगले, लादेवाडी, फकीरवाडी, शिंगटेवाडी, चिखलवाडी, कांदे गावच्या शिवारात अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. आज सकाळी सातच्या सुमारास तानाजी आबा चरापले नेहमीप्रमाणे जनावरांचे दूध काढण्यासाठी गेले असताना बिबट्याने बंदिस्त शेडच्या भिंतीवर चढून आत प्रवेश करून एका वर्षाच्या कालवडीवर व रेडीवर हल्ला करून त्यांना ठार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ कळवले, त्यानंतर वनरक्षक शिवाजी देसाई व संभाजी पाटील यांनी येऊन पाहणी केली, मांगले परिसरात दोन ते तीन बिबट्यांचा नियमित वावर असल्याने शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. 

दोन महिन्यांपूर्वी शेवडी वस्ती जवळ एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते. त्या प्रमाणे काही ठिकाणी सापळा लावून या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard attack in Bambar mountain area; Kill two animals