कुष्ठरोग व क्षयरोग बंद तपासण्या, उपचार पुन्हा सुरू

घनशाम नवाथे 
Wednesday, 6 January 2021

कोरोनामुळे कुष्ठरुग्ण तसेच क्षयरोग रुग्णांच्या तपासण्या थांबल्या होत्या. लॉकडाऊनच्या काळात निदान व औषधोपचार घटल्याने गतवर्षीच्या तुलनेत प्रमाण घटले आहे.

सांगली : कोरोनामुळे कुष्ठरुग्ण तसेच क्षयरोग रुग्णांच्या तपासण्या थांबल्या होत्या. लॉकडाऊनच्या काळात निदान व औषधोपचार घटल्याने गतवर्षीच्या तुलनेत प्रमाण घटले आहे. आता 1 डिसेंबर 2020 पासून 31 जानेवारीअखेर संयुक्‍त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम जिल्हाभर राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. सुजाता जोशी यांनी दिली. 

डॉ. जोशी म्हणाल्या,""जिल्ह्यात 326 क्षयरोगी, तर 46 कुष्ठरोगी सापडले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यंदा रुग्णांची संख्या घटली आहे. कोरोना महामारीमुळे रुग्णालयात या रोगांच्या तपासण्या, उपचार बंद होते. आता कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर विशेष मोहीम राबवून या रुग्णांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासण्या, निदान सुरू असून 1775 आरोग्य पथके यासाठी कार्यरत आहेत. क्षय व कुष्ठरोग्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ उपचार करून प्रसार थांबवण्यासह या आजारांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. 

दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, रात्रीचा ताप, भूक मंदावणे, वजन घटणे, बडख्यातून रक्‍त पडण्याची लक्षणे दिसल्यास आरोग्य पथकामार्फत सर्व्हे करून तपासणी केली जाते. क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास औषधोपचार करण्याची सोय उपलब्ध आहे. लक्षणे नसणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक औषधोपचार केले जातात. शासकीय किंवा खासगी रुग्णालयात औषधोपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी दरमहा पाचशे रुपये जमा केले जातात. खासगी डॉक्‍टर किंवा औषध व्यावसायिकांकडून औषधोपचार घेणाऱ्यांची माहिती शासकीय रुग्णालयास कळवणे बंधनकारक आहे. 2025 पर्यंत क्षयरोग संपूर्ण नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती सुरू असून जनतेने त्याला पाठबळ देण्याचे आवाहन डॉ. जोशी यांनी केले. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leprosy and tuberculosis check-ups, resumption of treatment