
सांगली : कायम दुष्काळी अशी ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे काही हिरवे बदल दिसत आहेत. त्यात आता या तालुक्यात तंत्रज्ञान अंगिकाराचे वारेही वाहत आहे. तालुक्याच्या अग्नेय टोकाला असलेल्या कर्नाटक सीमेवरील 28 गावांमध्ये येरळावाणी या कम्युनिटी रेडिओद्वारे घरबसल्या मुलांना अध्यापन केले जात आहे. सध्या हा प्रयोग प्राथमिक स्वरुपाचा असला तरी त्याचा विस्तार जिल्हा परिषद शाळांपर्यंत न्यायचा प्रयत्न आहे.
सुमारे सोळा वर्षापुर्वी या भागात येरळा प्रोजेक्ट सोसायटीने कामाला सुरवात करताना शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यावेळी तिथे कोणी कॉम्पुटरही पाहिला नव्हता अशा काळात संस्थेने जालिहाळ या दुर्गम गावात राज्यातील पहिली ग्रामीण डिजिटल शाळा सुरु केली आणि आजही ती अत्यंत कार्यक्षमतेने सुरू आहे. विज्ञानाचे धडे देणारे क्युरासिटी सेंटर सुरु केले. कॉम्पुटर , टेलिव्हिजन , इंटरनेट व डिश कनेक्शन असं या शाळेच्या वर्गखोल्यांचे स्वरुप आहे. या परिसरात जनप्रबोधनाचे व्यापक काम करणारा "येरळावाणी 91.2 एफ' हा कम्युनिटी रेडिओ कार्यरत आहे. प्रामुख्याने मराठी आणि कन्नड अशा दोन्ही भाषेत चालणारा हा कम्युनिटी रेडिओ देशातील एकमेव असावा. या रेडिओचा उपयोग करीत "येरळा'ची डिजिटल शाळेच्या माध्यमातून आता "रेडिओ क्लासरुम' सुरु झाले आहेत.
रेडिओ क्लासरुम पध्दतीत विषय शिक्षक कोणता धडा रेडिओ क्लासरुम (RC) पद्धतीने शिकवायचा याचा निर्णय घेतो. काही धडे प्रत्यक्ष शिकवावे लागतात. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या घरातच रेडिओ क्लासरुम तयार करायची आहे. म्हणजे किमान 5 बाय 8 फूट लांबीची अभ्यासाची वेगळी खोली. तिथं बसूनच रेडिओ क्लासरुममध्ये विद्यार्थी सहभागी होतात. सोबत चांगल्या दर्जाचा रेडिओ अथवा इयर फोनसह मोबाईल फोन तयार ठेवून कनेक्ट होतात. रेडिओ कार्यक्रम सुरू व्हायच्या आगोदर 10 मिनिटात सर्व विद्यार्थी त्यांच्या घरातील क्लासरुममधून शिक्षकांना मिस कॉल देऊन हजेरी लावतात . रेडिओ समोर बसताना विद्यार्थी, त्या विषयाचे पुस्तक समोर ठेवून जो धडा शिकवला जाणार आहे तो उघडून, वाचतांनाच्या प्रत्येक ओळीवर बोटे फिरवत व वाचन फॉलो करतात. असं करण्याचा हेतू हाच की मुलांचे शंभर टक्के लक्ष रहावे. या साठी आवश्यक रेडिओ कार्यक्रम तेथील शिक्षकच तयार करतात. रेडिओ कार्यक्रमात पहिल्यांदा शिक्षक विषयाचा धडा वाचतात.
नंतर धड्यातल्या प्रमुख, महत्वाच्या म्हणजे धडा समजण्यासाठीसाठी व परीक्षेसाठी महत्वाच्या गोष्टी समजावून सांगतात. पुढच्या टप्प्यात शिक्षक विद्यार्थ्यांना या पाठावरील प्रश्न विचारतात. हे प्रश्न ऑबजेक्टीव्ह व ड्रीस्कप्टीव्ह असतात. ते विद्यार्थ्यांना लिहून घेता येतील इतक्याच गतीने सांगतात. सर्व विद्यार्थ्यांनी हे त्याची उत्तरे व्यवस्थित लिहून त्याचे फोटो पाठवतात. ज्यांना फोटो पाठवणे शक्य नाही ते उत्तरे प्रत्यक्ष कागदावर लिहून पाठवतात. प्रत्येक क्लासचे रेकॉर्डिंग करून ठेवले जाते. प्रत्येक मुलाचे प्रश्नोत्तरे फोटो , उत्तर पत्रिका याचा फोल्डर तयार करून कॉम्पुटर वर जपून ठेवले जाते. सर्व विषय व धडे या पद्धतीने शिकवता येत नाहीत. ते विषय इंटरऍक्टीव्ह व्हिडीओ पद्धतीने शिकवण्याचे प्रयोग सुरू आहेत. सध्याची ही प्रायोगिक कल्पना आणखी विस्तारण्याचा शिक्षकांचा प्रयत्न आहे.
प्रायोगिक तत्वावर सध्या आठवी आणि नववीच्या वर्गातील तीस मुले या रेडिओ क्लासरुम उपक्रमात सहभागी होत आहेत. आमच्या हायस्कुलशिवाय जिल्हा परिषद शाळांतील काही वर्गासाठीही आम्ही हा त्या शिक्षकांच्या सहकार्याने उपक्रम राबवणार आहोत. भविष्यात शिक्षणामध्ये हे बदल येणारच आहेत. त्याची तयारीही यानिमित्ताने होत आहे.
नारायण देशपांडे
संस्थापक,स्कुल ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन (स्कोप)
जालिहाळ (बु)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.