
सांगली- "सकाळ'ने नेहमीच विकासाची आणि लोकसहभागाची भूमिका घेतली आहे. महापर्यटन विशेषांकात जिल्ह्याच्या पर्यटन विकासाबाबत मांडलेल्या मुद्यांबाबतही प्रशासकीय स्तरावर पुढील वर्षभर पाठपुरावा करण्यात येईल, गती देऊ अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिली.
सांगली- "सकाळ'ने नेहमीच विकासाची आणि लोकसहभागाची भूमिका घेतली आहे. महापर्यटन विशेषांकात जिल्ह्याच्या पर्यटन विकासाबाबत मांडलेल्या मुद्यांबाबतही प्रशासकीय स्तरावर पुढील वर्षभर पाठपुरावा करण्यात येईल, गती देऊ अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिली.
सकाळच्या सांगली विभागीय कार्यालयाच्या 37 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, सहयोगी संपादक शेखर जोशी यावेळी उपस्थित होते. यावेळी सकाळच्या महा-पर्यटन विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थापक संपादक नानासाहेब परुळेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.चौधरी म्हणाले,"" सकाळ एक कुटुंब आहे. मला सांगण्यात आलं की कोरोनाच्या आपत्तीतही सकाळ व्यवस्थापनाने कामगार हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कोणालाही वाऱ्यावर सोडले नाही. कंपनी एक कुटुंब असल्याची जी भावना सकाळ माध्यम समुहाने दाखवली ती इतरांसाठी आदर्श आहे. कोरोना सुरक्षिततचे निकष पाळून आजचा घेतलेला कार्यक्रमही तुम्हाला इतरांविषयी बोलण्याचा अधिकार देणारा आहे. एक अभ्यास सांगतो की, पर्यटन आणि हॉस्पॅटिलिटी क्षेत्रातून यापुढे सर्वाधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत. रोजगार निर्मिती हे यापुढचे सर्वात मोठे आव्हान आहे. सकाळने आजच्या अंकात विशेषांकात जिल्ह्याच्या पर्यटन विकासाबद्दल अधिकारी आणि संबंधितांनी केलेले लेखन मी पाहिले. त्या मुद्यांचा विचार करून जिल्ह्यातील पर्यटनविषयक योजनांना पुढील वर्षभरात गती देण्याचा मी शब्द देतो.''
आमदार गाडगीळ म्हणाले,"" टुरीस्ट कंपन्यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या दोन दिवसांच्या सहलींचे नियोजन करावे. त्यांना नक्की प्रतिसाद मिळेल. त्यातून जिल्ह्यातील पर्यटनविकासाला गती मिळेल.'' सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले,""यावेळी त्यांनी यंदाच्या कोरोना आपत्तीच्या पार्श्वभुमीवर "सकाळ' व्यवस्थापनाने हा समारंभ साधेपणाने आणि सर्व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून करुनच घेण्याचा निर्णय घेतला. कोरोना ठप्प झालेल्या अर्थकारणाला गती देण्यासाठी यंदा पर्यटन या विषयावर पुरवणी केली आहे. कारण पर्यटन पुर्वपदावर येईल तेव्हाच समाज व्यवहाराचा गाडा पुर्वपदावर येत असतो. जिल्ह्यासाठी चांदोली आणि वैद्यकीय क्षेत्र पर्यटनविकासाचे स्तंभ आहेत. त्यासाठी पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी सर्वांनी सुनियोजित प्रयत्न केले पाहिजेत.''
...तर आधी "सकाळ'च वाचा !
महापालिका क्षेत्राच्या विकासाची भूमिका "सकाळ' ने नेहमीच घेतली असल्याचे नमुद करून महापौर सुतार म्हणाल्या,"" महापालिकेतील कोणत्याही विषयांबाबत, बातम्यांबाबत संभ्रमाचे वातावरण असते. तेव्हा मी सर्वांना सल्ला देते की आधी "सकाळ' वाचा. कारण "सकाळ'ने वस्तुनिष्ठ वार्तांकनाला नेहमीच महत्व दिले आहे. त्यामुळे मी आधी "सकाळ'च वाचते. तसा सल्ला मी माझ्या सहकाऱ्यांनाही देते.''