जतच्या पाणीप्रश्‍नासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावू

राजू पुजारी 
Saturday, 6 February 2021

दुष्काळी जत तालुक्‍याच्या पाणीप्रश्‍नासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत बैठक घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी जत येथे शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. 

संख : दुष्काळी जत तालुक्‍याच्या पाणीप्रश्‍नासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत बैठक घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी जत येथे शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. 

श्री. भुसे हे आमदार विक्रम सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भरवलेल्या माळरान कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनासाठी जत दौऱ्यावर आले होते. गुरुवारी दुपारी त्यांच्या स्वागतासाठी जत मध्ये शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी गर्दी केली होती. कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर दुपारी जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्टहाऊसवर त्यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांची बैठक घेतली. त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांची विशेष उपस्थिती होती. 

या बैठकीस उपजिल्हाप्रमुख तम्मा कुलाळा, तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, युवा तालुका प्रमुख नागनाथ मोठे, उपप्रमुख प्रवीण औरदी, दिनकर पतंगे, रमेश कदम, श्रीशैल उमराणी, संजय सावंत, विजयराजे चव्हाण, शिवानंद तेली आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. 

या बैठकीत तालुका प्रमुख अंकुश हुवाळे यांनी दुष्काळी जत तालुक्‍याच्या पाणीप्रश्न हात घालून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दहा वर्षांपूर्वीचे माडग्याळ दौऱ्याचा प्रसंग कथन करून, जत पूर्व भागातील 42 गावांतील पाणी प्रश्नासाठी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिलेल्या गावातील नागरिकांना परावृत्त करून त्यांचा पाणी प्रश्न सोडवण्याचा शब्द दिल्याची आठवण करून दिली. तसेच सध्या हा प्रश्न सोडवण्यासाठी श्री. ठाकरे यांच्यासोबत बैठक लावून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्याची मागणी केली. श्री. विभूते यांनीही श्री. भुसे यांच्याकडे लवकरात लवकर या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावून पाणीप्रश्‍न सोडावण्याची विनंती केली. यावर श्री. भुसे यांनीही जत तालुक्‍याचा पाणी प्रश्न, तसेच शेतकऱ्यांच्या निगडित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's have a meeting with the Chief Minister for the water issue