चला पाहूया चंद्राला : आज आंतरराष्ट्रीय चंद्र निरीक्षण रात्र

बलराज पवार
Saturday, 26 September 2020

अमेरिकेतील "नासा' संस्थेच्या वतीने 2010 पासून सप्टेंबर महिन्यात अष्टमीच्या जवळपास "आंतरराष्ट्रीय चंद्र निरीक्षण रात्र' या सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षी 26 सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी ही रात्र साजरी होत आहे.

सांगली : अमेरिकेतील "नासा' संस्थेच्या वतीने 2010 पासून सप्टेंबर महिन्यात अष्टमीच्या जवळपास "आंतरराष्ट्रीय चंद्र निरीक्षण रात्र' या सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षी 26 सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी ही रात्र साजरी होत आहे, अशी माहिती हौशी खगोल निरीक्षक शंकर शेलार यांनी दिली. जेथे असाल तेथून चंद्राचे निरीक्षण करून या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि आनंद लुटावा असे आवाहन "नासा'ने केले आहे, असे त्यांनी सांगितले. 

शेलार म्हणाले, ""कथा, कादंबऱ्या, पुराणे, ग्रंथ अशा सर्व प्रकारच्या वाङमय साहित्यात डोकावणारा चंद्र हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे. मानवाचे अवघे सांस्कृतिक विश्व व्यापून उरणारा, सौंदर्याचे, प्रेमाचं प्रतीक मानला गेलेला "चंद्र' हा कसा आहे हे जाणून घेण्यासाठी "आंतरराष्ट्रीय चंद्र निरीक्षण रात्र' या सोहळ्याचे आयोजन केले जाते.

सर्व उत्साही चंद्रप्रेमींना इंटरनेटद्वारे व्हर्च्युअल टेलिस्कोपद्वारे, नासाच्या फेसबुक पेजसारख्या समाज माध्यमांतून सहभागी होण्याची संधी मिळेल. आपल्या घरातूनच सहभागी होता येईल. चंद्राचे निरीक्षण, शास्त्रीय माहिती, चांद्रमोहिमांबद्दल माहिती करून घेता येईल. 

ते म्हणाले, ""तुम्ही प्रत्यक्ष "चंद्र निरीक्षण' उपक्रम आयोजित करू शकता किंवा सहभागी होऊ शकता. ऑनलाईन चंद्रदर्शन, माहिती देऊ शकता किंवा अटेंड करू शकता. फेसबुक लाईव्ह प्रोग्रॅमद्वारे माहिती देऊ शकता. सध्या कोरोनाचा प्रसार वाढलेला आहे. हे लक्षात घेऊन प्रतिबंधक नियमांचे ( सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर) पालन करूनच चंद्र निरीक्षण करावे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's look at the moon: Today is International Lunar Observation Night