
सन 2008 साली खोकेमुक्त शहर झालेली सांगली पुन्हा एकदा "खोक्यांचे शहर' होत असल्याचे आज "सकाळ' ने उजेडात आणले. हे घडत असतानाच खोकीधारकांनी जागा बळकावण्याचा प्रकार किती उघडपणे सुरु केला आहे.
सांगली : सन 2008 साली खोकेमुक्त शहर झालेली सांगली पुन्हा एकदा "खोक्यांचे शहर' होत असल्याचे आज "सकाळ' ने उजेडात आणले. हे घडत असतानाच खोकीधारकांनी जागा बळकावण्याचा प्रकार किती उघडपणे सुरु केला आहे, याचा नमुना रिसाला रोडवर घडला. सोमवारी सायंकाळी त्या ठिकाणी एक खोके गुपचूप येऊन उभे केले. शहरात अनेक ठिकाणी असा "रात्रीस खेळ चाले' सुरु आहे.
शहराला खोक्यांचा पुन्हा वेढा पडत आहे. खोक्यांची माळ सजते आहे. जागा मिळेल तेथे खोकी उभी केली जात आहे. त्याला कुणी विरोध केला तर त्याच्यावर दबाव आणला जात आहे. कुणी कुणाला विरोध करायचाच नाही, असा प्रकार सुरु आहे. रिसाला रस्त्यावर तेच घडले.
सोमवारी सायंकाळी एक खोके तेथे आणून उभे केले. त्याचा छायाचित्र घेतले जात असताना बाजूच्या खोकीधारकांनी "हे खोके दुकान सुरु करण्यासाठी नसून ते महापिलेकेनेच आणून टाकलेय. कदाचित, जप्त केलेले असेल, या रिकामा जागी आणून टाकले आहे', असा खुलासा केला. वास्तविक, महापालिका इतकी तत्पर नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नव्हती. हे लोक खोटे बोलत होते, याचा उलगडा पुढे पंढरा मिनिटांत झाला.
"सकाळ'चे छायाचित्रकार जागा बळकावण्याच्या आणि खोकी उभा करण्याच्या प्रकाराचा फोटो घेत आहेत, ही बातमी खोक्याच्या मालकाला कळाली. तो तडक आला. हे खोके माझेच आहे, असे सांगितले. त्याचा क्रमांक दाखवला. याआधी हे खोके येथेच होते, असा दावा केला. महापुरात ते खराब झाले होते, आता बसवत आहे, असे सांगितले. वास्तविक, तेथे खोके नव्हतेच. महापुराला दीड वर्ष उलटले. खोक्यावर पोट भरणारा व्यक्ती इतका काळ गप्प बसणार आहे थोडीच? सध्या शहरात जागा दिसेल तेथे खोके टाकण्याचा धंदा तेजीत आहेत. त्याचाच हा नमुना.
महापालिकेला अजून त्याचे सोयरसुतक नाही. शहरात पुन्हा खोकीच खोकी झाल्यावर त्यांना धक्का लावणे अवघड आहे. सन 2008 ला जमले म्हणून पुन्हा जमेल, असे नाही. त्यामुळे याबाबत गांभिर्याने घ्यावे लागणार आहे. अर्थात, ती ना कारभाऱ्यांची मानसिकता आहे, ना अधिकाऱ्यांची.
संपादन : प्रफुल्ल सुतार