द्राक्ष बागायतदारांची धडपड; बागा वाचवूच अन्‌ निर्यातीचेही पाहू

विष्णू मोहिते
Saturday, 24 October 2020

गेली दोन वर्षे झालेली अतिवृष्टी, कोरोना महामारीची संकटामागून संकटे. पुढील बाजारपेठेचा अंदाजच नाही तरीही द्राक्ष उत्पादक यंदा पुन्हा निर्यातीच्या तयारीत होता. तोच गेल्या आठवड्यापासून पुन्हा वादळी पावसाचा दणका बसला.

सांगली : गेली दोन वर्षे झालेली अतिवृष्टी, कोरोना महामारीची संकटामागून संकटे. पुढील बाजारपेठेचा अंदाजच नाही तरीही द्राक्ष उत्पादक यंदा पुन्हा निर्यातीच्या तयारीत होता. तोच गेल्या आठवड्यापासून पुन्हा वादळी पावसाचा दणका बसला. पुन्हा द्राक्ष बागा वाचवण्यास शेतकऱ्यांची पुन्हा धावाधाव सुरु झाली आहे. सध्या निर्यातीपेक्षा शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात बागा वाचवूच अन्‌ निर्यातीचेही पाहू, अशीच भूमिका घेतली आहे. चांगल्या उत्पादनासाठी जिद्दीने लढा सुरु आहे. 

गेल्यावर्षीची अतिवृष्टी, कोरोना महामारी, तीन महिन्यांपूर्वी केंद्राने 27 किटकनाशक, बुरशीनाशकांवर पर्यायी औषध न देता बंदी घातली. दीड महिन्यापूर्वीच रशियाने महाराष्ट्रातून निर्यात करणाऱ्या 41 कंपन्याचे परवाने रद्द केले, असे धक्‍क्‍यावर धक्के बसत आहेत. तरीही यंदा बाजारपेठेचा अंदाज न येता शेतकऱ्यांनी द्राक्ष हंगामाला सुरुवात केली. पुन्हा 10 ऑक्‍टोबरपासून वादळी पावसाने सांगलीच नव्हे तर राज्यातील नाशिक, जालना, सोलापूर, इंदापूरसह काही प्रमाणात जालना, उस्मानाबाद, कर्नाटकच्या सीमा भागाला अतिवृष्टीने हाहाकार माजवला. द्राक्ष शेतकरी पुन्हा एकदा हबकला. पोंगा, फुलोरा अवस्थेतील बागांना जोरदार फटका बसतोय. बागा वाचवण्यासाठी रात्रन्‌दिवस फवारण्यांचा पुन्हा एकदा मारा सुरु झाला. 

त्यातच कोरोना पार्श्‍वभूमीवर कृषी व्यावसायिकांच्या रोखीच्या भूमिकेने सामान्य शेतकरी मेटाकुटीला आहे. तरीही शेतकऱ्यांनी जिद्द, चिकाटी सोडली नाही. बागांत औषध फवारणी करताना ट्रॅक्‍टर अडकत आहेत. त्यांना बाहेर काढण्याच्या कसरतींसह एसटीपी पंपाने औषध फवारणीत पाईप ओढताना आतडी गळ्याला येत आहेत. तरीही कुटुंबाला जगवण्यासाठी शेतकऱ्यांचा लढा जिद्दीने सुरु आहे. त्यात मग एकरी चार मजुर जगवणे होते. मात्र त्यांच्याकडूनही उत्पादकांना या काळात समजून घेण्याचे प्रकार कमी झाला आहे. दिवसभर बसले तरी पगार आणि अर्धा, एक तास जादा काम केले तरी पगार, अशी अवस्था आहे. 

काबाडकष्ट सुरु असले तरी शेतकऱ्यांनी स्थानिक बाजारापेक्षा निर्यातीत चांगल्या दराच्या अपेक्षेने युरोप राहू द्या, अन्य देशात निर्यातीचे नियोजन होतानाचे चित्र कायम आहे. जिल्ह्यात 1.20 लाख एकरावर द्राक्ष बागा आहेत. गेल्यावर्षी कोरोना संकटातही जिल्ह्यातून द्राक्ष, डाळींब, भाजीपाल्याची विक्रमी निर्यात झाली होती. सन 2019-20 मध्ये 32 हजार 832 टन निर्यात झाली आहे. विशेष म्हणजे युरोपीय 13 देशात 7 हजार 937 टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. ती गेल्यावेळपेक्षा 514 टनांनी जास्त आहे. 

प्रतिकूल परिस्थितीतही जिल्ह्यातून चांगल्या निर्यातीची पंरपरा यंदाही कायम राहिल. सध्या निर्यातीसाठी नव्या, जुन्या शेतकऱ्यांची नोंदणी सुरु झाली आहे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनानुसार शेतकरी काम करीत आहेत. चांगल्या हंगामासाठी प्रयत्न सुरु आहेत. 
- रविराज माळी, द्राक्ष उत्पादक, सोनी. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's save the orchards and also look at food exports