esakal | अध्यक्ष बदलासाठी पत्रप्रपंच; भाजपमध्ये हालचाली गतिमान
sakal

बोलून बातमी शोधा

letter Correspondence for a change of president; Movements are in full swing in BJP

सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि पदाधिकारी बदलासाठीच्या हालचाली पुन्हा गतिमान झाल्या आहेत.

अध्यक्ष बदलासाठी पत्रप्रपंच; भाजपमध्ये हालचाली गतिमान

sakal_logo
By
अजित झळके

सांगली ः जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि पदाधिकारी बदलासाठीच्या हालचाली पुन्हा गतिमान झाल्या आहेत. इच्छुकांनी सर्व सदस्यांकडून पत्र मिळवून ती नेत्यांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम हाती घेतली आहे. नव्या लोकांना संधी मिळाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका सदस्यांनी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ते पुन्हा भेटणार आहेत.

जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. सोबतीला शिवसेना, रयत विकास आघाडी आणि अजितराव घोरपडे समर्थकांची साथ आहे. भाजप अल्पमतात आहे. या स्थितीत राष्ट्रवादीने डावपेच खेळले आणि त्याला शिवसेना, कॉंग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह घोरपडे समर्थकांनी साथ दिली तर जिल्हा परिषदेत सत्ताबदल होऊ शकतो, अशीही परिस्थिती आहे. प्रथम मान मिळालेल्या पदाधिकाऱ्यांना पावणेतीन वर्षे संधी मिळाली. त्यानंतर आरक्षण बदल झाला आणि नवे पदाधिकारी निवडले गेले. त्यावेळी महाविकास आघाडीचा डाव जमला नाही.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फोडाफोडीत रस नसल्याचे सांगून त्यातून हवा काढली. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, दोन सभापती झाले. एक सभापतीपद विकास आघाडीला तर एक घोरपडे गटाला मिळाले. आता इच्छुकांची संख्या मोठी आहे. आरग येथील सरिता कोरबू या अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यांना डावलून गेल्यावेळी प्राजक्ता कोरे यांना संधी मिळाली होती. त्यात सभापती आणि उपाध्यक्ष पदासाठीही शर्यत मोठी असणार आहे. 

या स्थितीत राष्ट्रवादी फोडाफोडी करेल की काय, अशी भीती चंद्रकांत पाटील यांना आहे. तसे झाले तर भाजपच्या हातून सत्ता निसटू शकते. त्यामुळे ते सावध आहेत. दुसरीकडे इच्छुकांनी मात्र राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना असा प्रयोग करणार नाहीत, शेवटच्या टप्प्यात येऊन हा खेळ करण्यात त्यांना रस नाही, असे सांगून भीती कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

या साऱ्यात सदस्यांकडून पत्र मिळवून अध्यक्ष बदलासाठीची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याला तालुकास्तर नेते कसा प्रतिसाद देतात, हे आधी पहावे लागेल. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या कोर्टात चेंडू असेल.

संपादन : युवराज यादव

loading image