जिंदगीचा झाला तमाशा...  लॉकडाऊनमुळं लोककलाकार देशोधडीला

Life has become a spectacle ... Folk artist has gone into exile due to lockdown
Life has become a spectacle ... Folk artist has gone into exile due to lockdown

माधवनगर (जि. सांगली)  : सुपाऱ्यावर सुपाऱ्या खिशात होत्या, पण सरकारनं सगळं लॉक केलं. नगर जिल्ह्यात राशन गावात अडकलोवतो. सगळ्यांना पाच पाचशे देऊन गावाकडं पाठवलं. आमीबी ट्रक घेऊन कसबसं गावाकडं आलो. आता वरीस होत आलं... ट्रक अजून जाग्यावरच आहेत. गावाकडं गेलेली माणसं परत यायचं नाव घेईनात. तमाशा झाला राव समदा आमचा...

असं काकुळतीनं सांगणाऱ्या विजयकुमार खाडे यांच्या काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळाचं सलग दुसरं वर्ष लॉकडाऊननं खाल्लं. सगळीकडच्या यात्रा जत्रा बंद असल्यामुळं यंदाही शो करायचे का नाही, या संभ्रमात फड मालक आहेत. सलग दोन सिझन लॉकडाऊनमध्ये अडकल्यानं राज्यातील लोककला आणि लोककलाकार देशोधडीला लागायची वेळ आली आहे. 

ज्यांनी एके काळी उभा-आडवा महाराष्ट्र आपल्या लोककलेनं खुळा केला होता, त्या काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळाची ही अवस्था आहे. काळू-बाळू, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, मालती इनामदार, हरीभाऊ नगरकर, आनंद लोकनाट्य जळगाव, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, भिका भीमा सांगवीकर ही महाराष्ट्रातली नामांकित तमासगीर घराणी... पण लॉकडाऊननं सारी घाईला आली आहेत.

फक्त तमाशा मंडळंच नाहीत तर दशावतार करणारी मंडळी, लावणी शो करणारे कलाकार, कार्यक्रमासाठी सुपारी घेणारी लेझीम पथके, पोवाडा गाणारे शाहीर, तमाशा कलावंत, भजन, कीर्तन करणारे लोक, भारुड, गोंधळ घालणारे कलाकार, डोंबाऱ्याचा खेळ करणारे लोक, पहाटे दारावर येऊन भिक्षा मागणारा वासुदेव, देवदासी....साऱ्यांचे संसार अक्षरश: रस्त्यावर आले आहेत. कलेवर जगायचे दिवस अगोदर संपले होतेच, पण लॉकडाऊनमुळं लोककलेसोबत लोककलाकारांचं जगणंही मुश्‍कील झालं आहे. लॉकडाऊनमुळं या कलेचं आणि कलाकारांचं कंबरडं मोडलेलं असताना, त्यांना ना शासन विचारतं ना समाज. 

शासनानं थिएटर सुरू करायला परवानगी दिली खरी, पण तिकिटंच खपत नाहीत. लावणी शोला परवानगी दिली, तर साऱ्या खुर्च्या रिकाम्याच. शासनानं तमाशाला परवानगी दिली, पण यात्रांना परवानगी दिली नाही. असा सारा सरकारी कारभार आहे. यात्राच बंद असतील, तर आम्ही तमाशा कुठं घरात करायचा का असा सवाल हे कलाकार करत आहेत. 

गेलं वर्ष तोट्यात गेलं असताना आता यंदा पुन्हा सारी जमवाजमव करायची तर आठ ते दहा लाख रुपये लागतील... आणि समजा हे सारं धाडसानं केलंच... तर घातलेले पैसे तरी परत मिळतील का हा सवाल आहेच. कारण आजअखेर जत्रा यात्रा सुरू नाहीत आणि अजून दोन महिन्यांनी हा सिझन संपणार आहे. सोईसोईनं खेळ... नाहीतर फुटून जाईल बुधली आणि वाहून जाईल तेल... अशी घुसमट विजयकुमार यांनी व्यक्त केली. 

लॉकडाऊन लवकर संपलं तर, नव्या जोमानं प्रयोग करू

दसरा ते अक्षयतृतीया हा तमाशाचा बहारदार हंगाम. पण नेमकं याच काळात लॉकडाऊन झालं आणि सारं संपलं. नोव्हेंबर ते मार्च 2020 मधले निम्मे शो झालेच नाहीत. या सात महिन्यांत 200- 210 च्या आसपास शो होतात; पण लॉकडाऊनमुळं ते कसेबसे शंभरभर झाले. गुढीपाडव्यापासून यात्रांमधून ओपन शो होतात. पण यंदाचं हे सलग दुसरं वर्ष. यात्रा जत्रा बंद आहेत. मग बाहेर पडून करणार काय? सुदैवानं लॉकडाऊन लवकर संपलं तर, नव्या जोमानं प्रयोग सुरू करू. 
- विजयकुमार खाडे, व्यवस्थापक, काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com