esakal | जीवन अमूल्य आहे..; उपायाकडे जाणारा दृष्टिकोन गरजेचा
sakal

बोलून बातमी शोधा

Life is precious ..; An approach to the solution is needed

नॅशनल क्राईम रेकॉर्डस्‌ ब्यूरोच्या अहवालानुसार 2019 मध्ये एक लाख 33 हजार 623 आत्महत्यांची नोंद झाली. त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 18 हजार 916 आत्महत्या आहेत. गेली काही वर्षे हा अग्रक्रम कायम आहे.

जीवन अमूल्य आहे..; उपायाकडे जाणारा दृष्टिकोन गरजेचा

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

दरवर्षी 10 सप्टेंबरपूर्वी किंवा नंतरचे सात दिवस देशभरात आत्महत्या प्रतिबंध सप्ताह म्हणून पाळला जातो. आपल्याकडे पूर्वापार धार्मिक रूढी-परंपरांमधून देहत्यागाला प्रतिष्ठा दिली गेली. त्यामुळे आत्महत्येबद्दल प्रतिष्ठा देणे किंवा गुन्हा मानणे असे दोन्ही प्रकार दिसून येतात. त्याऐवजी आत्महत्येच्या नकारात्मक विचारांना दूर ठेवण्यासाठीच्या प्रबोधनाच्या हेतूने हा सप्ताह पाळला जातो. नॅशनल क्राईम रेकॉर्डस्‌ ब्यूरोच्या अहवालानुसार 2019 मध्ये एक लाख 33 हजार 623 आत्महत्यांची नोंद झाली. त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 18 हजार 916 आत्महत्या आहेत. गेली काही वर्षे हा अग्रक्रम कायम आहे. शिवाय, पोलिस दप्तरी नोंदच न होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाणही मोठे आहे. एकूण चिंता वाटावी, अशी ही संख्या आहे. जीवन अमूल्य आहे. तरीही आत्महत्या होतात. प्रत्येक आत्महत्या ही व्यक्तिगत शोकांतिका असली, तरी अंतिमतः ती कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजावर दूरगामी परिणाम करते. त्यामागे नानाविध कारणे असतात. एनसीआरबीच्या ताज्या अहवालात देशभरातील आत्महत्यांचे उभे-आडवे विश्‍लेषण केले आहे. या समस्येच्या मुळापर्यंत जाण्यासाठी काही महत्त्वाचे धागे मिळतात. त्यातील काही महत्त्वाची टिपणे, सोबत आत्महत्यापूर्व लक्षणे, त्या टाळण्यासाठीच्या उपाययोजना आणि सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात या समस्येकडे कौटुंबिक व सामाजिक स्तरावर कसे सामोरे जाता येईल, याविषयी तज्ज्ञांनी मांडलेली मते... 

देशातील वर्षनिहाय आत्महत्यांची नोंद 

 • 2015..... 1 लाख 33 हजार 629 
 • 2016......1 लाख 31 हजार 008 
 • 2017......1 लाख 29 हजार 887 
 • 2018..... 1 लाख 34 हजार 516 
 • 2019..... 1 लाख 39 हजार 123 


सर्वाधिक आत्महत्या नोंद असलेली राज्ये 

 • राज्य ...........आत्महत्या संख्या...... देशाच्या तुलनेत टक्केवारी 
 • महाराष्ट्र.......18,916....................13.6 टक्के 
 • तमिळनाडू.... 13,493................... 9.7 टक्के 
 • पश्‍चिम बंगाल.. 12,665................ 9.1 टक्के 
 • मध्य प्रदेश....... 12,457............... 9.0 टक्के 
 • कर्नाटक........... 11,288............... 8.1 टक्के 

आत्महत्यांमागची कारणे 

 • कौटुंबिक समस्या : 32.4 टक्के 
 • आजारपण : 17.1 टक्के 
 • व्यसनांधता : 5.6 टक्के 
 • विवाहसंबंधित कारणे : 5.5 टक्के 
 • प्रेम प्रकरण :  4.5 टक्के 
 • कर्जबाजारीपण : 4.2 टक्के 
 • शैक्षणिक परीक्षा अपयश :  2.0 टक्के 
 • बेरोजगारी : 2.0 टक्के 
 • व्यावसायिक करिअर समस्या : 1.2 टक्के 
 • मालमत्ता वादविवाद : 1.1 टक्के 
 • जवळच्या व्यक्तींचे मृत्यू : 0.9 टक्के 
 • दारिद्य्राला कंटाळून : 0.8 टक्के 
 • शंकास्पद अवैध नातेसंबंध : 0.5 टक्के 
 • सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागल्याने :  0.4 टक्के 
 • नपुसकत्व, वंध्यत्व : 0.3 टक्के 
 • इतर कारणे : 11.1 टक्के 
 • कारणच माहिती नाही : 10.3 टक्के 


"एनसीआरबी'च्या अहवालातील काही महत्त्वाचे निष्कर्ष 
आत्महत्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण 70.2, तर महिलांचे 29.8 टक्के 
आत्महत्याग्रस्त महिलांमध्ये 51.5 टक्के गृहिणींचा समावेश 
आत्महत्येमध्ये 1.2 टक्के शासकीय कर्मचारी, तर 7.4 टक्के शेतकरी 
विद्यार्थी आणि बेरोजगारांचे प्रमाण 7.4 टक्के 
18 ते 30 वयोगटात 35.1 टक्के, तर 30 ते 45 वयोगटात 31.8 टक्के आत्महत्या 
देशात गतवर्षी 10 हजार 281 शेतकरी-शेतमजुरांच्या आत्महत्या 
देशातील 53 महानगरांमध्ये 2017 ते 2019 या काळात आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचे निष्कर्ष असून, ते 1.7, 0.8 वरून 4.6 टक्के इतके वाढीव प्रमाण आहे 
समूह आत्महत्यांच्या 11 राज्यांत 72 घटनांमध्ये 180 जणांचा मृत्यू 
समूह आत्महत्यांत तमिळनाडू (16), आंध्र प्रदेश (14), केरळ (11) राज्ये पुढे 

आत्महत्याग्रस्तांच्या नोंदीचे शैक्षणिक पात्रतेचे विश्‍लेषण 

 • अशिक्षित : 12.6 टक्के 
 • पहिली ते चौथी : 16.3 टक्के 
 • पाचवी ते आठवी : 19.6 टक्के 
 • नववी ते दहावी : 23.3 टक्के 
 • अकरावी ते बारावी : 14.0 टक्के 
 • पदविका  : 1.2 टक्के 
 • पदवी-पदव्युत्तर  : 3.7 टक्के 
 • प्रोफेशनल्स पदवीधारक : 0.2 टक्के 
 • शैक्षणिक पात्रता माहीत नाही असे : 8.9 टक्के 

पूर्वलक्षणे संकेत ओळखा 
आत्महत्येआधी संबंधित व्यक्ती काही ना काही संकेत देत असते. नैराश्‍यपूर्ण वाक्‍ये, एकाकी राहणे, उत्साहाचा आव आणून निरवानिरवीची भाषा करणे, पैशांचे व्यवहार पूर्ण करणे, वृद्ध मंडळी प्रॉपर्टीचे वाद मिटविण्याचा प्रयत्न करतात. कधी-कधी वर्तनात द्विधा स्थिती दिसते. म्हणजे मरणाच्या टोकाचा विचार ते करीत नाहीत, मात्र त्या आसपासचा ते विचार करीत असतात. कधी-कधी ते एसएमएस किंवा व्हिडिओ कॉलिंग करून पूर्वकल्पना देतात. मृत्यूनंतरच्या जगाची माहिती घेणे, अशा साईट्‌स इंटरनेट सर्फिंग करणे, कमीत कमी त्रास होईल अशा आत्महत्यांच्या मार्गाचा विचार करणे या साऱ्या पूर्व लक्षणांकडे कुटुंबातील व्यक्तींचे लक्ष हवे. सध्याचे कोरोना मानसिक संकट घेऊन आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. एकमेकांना धीर देऊन आपण यातून कसे बाहेर पडू, याचे समग्र नियोजन केले पाहिजे. आजारपण, बेरोजगारी, आर्थिक विवंचना आणि अंधारमय भवितव्य अशी संकटे प्रत्येक कुटुंबावर आहेत. त्यावर मात करण्यासाठी संवादाने मार्ग शोधले पाहिजेत. 
- कालिदास पाटील, कार्याध्यक्ष, राज्य मानसतज्ज्ञ असोशिएशन 

वुई आर टीम... भावना हवी 
संकटे सर्वांसमोरच असतात. म्हणून प्रत्येक जण आत्महत्या करीत नाही. म्हणजे अशा व्यक्तीची जडणघडण होताना काही ना काही कॉम्प्लेक्‍स असतो. तो खूप अभ्यासाचा विषय आहे. मात्र "सर्व आशा संपुष्टात येणे' ही आत्महत्येआधीची एक स्टेज असते. त्यामुळे अशा स्थितीत जगण्याचे काही ना काही एक प्रयोजन शिल्लक असेल तर माणूस आत्महत्येपासून परावृत्त होऊ शकतो. त्याला आम्ही मानसोपचाराच्या भाषेत "हुक अडकून असणे' असं म्हणतो. ते म्हणजे मूल-कुटुंबाप्रति जबाबदारीची काही एक गोष्ट करणे बाकी असणे, बऱ्याचदा अशा नैराश्‍याच्या काळात आप्तमित्र धीराचे जे सल्ले देतात तेही घातक ठरतात. "अरे... तू नको त्या गोष्टीत लक्ष घालतो. खाऊन पिऊन मजेत जगायचे. कशाला चिंता करायची?'... अशा स्वरूपाचे सल्ले देताना आपण त्या व्यक्तीच्या तत्कालीन मानसिक स्थितीचा विचार करीत नाही. खरे तर अशा सल्ल्याने आपण त्यांना अधिक वेगळे-एकाकी पाडतो. जगावेगळा काही तरी तो विचार करतोय, अशी भावना त्याची करवून देत असतो. त्याऐवजी "तुला अमुक गोष्टीचा त्रास होणे साहजिक आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे. मात्र, आपल्याला त्यावर मात करायला हवी. तू कधीही मला फोन कर. धीर ठेव... आपण त्यावर नक्की उपाय शोधू.' अशा स्वरूपाचा समजून घेऊन उपायाकडे जाणारा दृष्टिकोन गरजेचा आहे. वी आर टीम... अशा दृष्टिकोनातून आपण त्या व्यक्तीला आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करू शकतो. 
- डॉ. चारुदत्त कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ 

आधार व्यवस्थेची गरज 
कोरोनाच्या सध्याच्या संकटकाळात आपल्या आजुबाजूला आत्महत्येच्या घटना कानावर येत आहेत. सध्याची एकूण सामाजिक परिस्थिती पाहता हे प्रमाण येत्या काळात आणखी वाढण्याची कुशंका आहे. कोरोनाविषयीची अनावश्‍यक भीती, खोटा प्रचार, शासन यंत्रणेचे उपचारांबाबतचे हात झटकणे अशा कारणांमुळे असे प्रकार वाढत आहेत. भीतीबरोबरच या रोगाविषयी घृणेचे वातावरणही तयार झाले आहे. त्यातून सामाजिक बहिष्कारासारखे प्रकार घडत आहे. त्यातून रुग्ण आत्मविश्‍वास गमावून आत्महत्या करीत आहेत. एकूणच हे अभूतपूर्व असं संकट आहे. त्याला समाज म्हणून तोंड देण्यास आपण सारे कमी पडत आहोत. खरेतर या प्रसंगात शासन आणि समाजातून एक खंबीर अशी आधार देण्याची भूमिका घेतली पाहिजे. विशेषतः नव्याने अर्थकारणाची बांधणी करून आपण उभे राहणार आहोत, असा संदेश समाजात गेला पाहिजे. त्यासाठी शासनाने तज्ज्ञांची समिती नियुक्त करून एक कृती आराखडा जनतेसमोर सादर केला पाहिजे. दुसरीकडे व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवरही असा आराखडा तयार केला पाहिजे. विशेषतः येणाऱ्या काळात अनावश्‍यक खर्च टाळले पाहिजेत. आज समाजात अशी दणकट सपोर्ट सिस्टीम उभी करण्यासाठी "मानसमित्र' फळी उभी राहिली पाहिजे. स्वयंसेवी संस्थांना या कामी बळ देण्यासाठी दानशूरांनी मदत केली पाहिजे. या संस्थांचे अर्थकारणही पुरते कोलमडले असून, त्याकडे लक्ष दिले पाहिजे. 
- डॉ. प्रदीप पाटील, क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट 

संपादन : युवराज यादव