आयुष्य...दीड कोटी मधमाशांसोबतचे !

मिरजेच्या राहुल देवल यांचे आगळेवेगळे करिअरः १२ हजार किलो मधनिर्मिती
miraj
mirajsakal

सांगली : करिअर कशातही करता येतं; फक्त आवड हवी. मिरजेतील राहुल देवल यांनी आपलं करिअर चक्क मधमाशांसोबत घडवलंय. त्यांच्या या करिअरचा भाग आहेत दीड कोटी मधमाशा. त्यांच्यासोबत त्यांनी अवघा उत्तर भारत पालथा घातला आहे. मधमाशांसोबतच त्यांची अहोरात्र भटकंती सुरु असते. त्यांच्यासोबत त्यांचे जगणे एका वेगळ्या करिअरची...आयुष्याची मजा आहे. गेल्या सहा वर्षात मधमाशा पालन करीत दरवर्षी १२ हजार किलो मध-निर्मितीपर्यंत त्यांनी मजल मारलीय.

म्हैसाळचे सर्कसवाले देवल परिचित आहेत. जगावेगळं करायचं हा वारसाच जणू देवल यांच्या ‘डीएनए’चा भाग असावा. शिक्षण वैद्यकीय उपकरण-साधनांच्या निर्मितीमधील पदविका, व्यवसाय संगणक दुरुस्ती-विक्री. इथंही ते चांगले सेट झाले मात्र त्यात ते रमले नाहीत. एकदा टीव्हीवर मधमाशांचा कार्यक्रम पाहताना त्यांना हे करिअर क्लिक झालं. मग त्यासाठी त्यांची शोधाशोध सुरु झाली. पुण्यात राष्ट्रीय मधमाशा संशोधन केंद्रात प्रशिक्षणानंतर महाबळेश्‍वरमध्ये खरेदीसह सारी गुंतवणूक केली आणि करिअर सुरु झाले.

आता त्यांच्याकडे युरोपीयन जातीच्या ॲपीस मेलीफरा जातीच्या मधमाशा त्यांनी पाळल्या आहेत. खादाड म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी त्यांचा मुक्काम दोन महिन्यापेक्षा अधिक ठेवता येत नाही. मग शिवार.. प्रांत.. राज्य बदलत सतत भटकंती करावी लागते. त्यांच्यासाठी त्यांना शिवारातच मुक्काम आला. अवघ्या पन्नास पेट्यांनी त्यांनी सुरवात केली आता त्यांच्याकडे साडेचारशे पेट्या आहेत. एका पेटीत सुमारे तीस ते पस्तीस हजार माशा..या हिशेबाने आज त्यांच्याकडे दीड कोटी मधमाशा आहेत.

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, राजस्थान असा अवघा उत्तर भारत त्यांनी मधमाशांसोबत पालथा घातला. जिथे बहरलेली फुले तिथे त्यांचा मुक्काम. साहजिकच फुले वेगवेगळी..ओघानेच मधाची चव वेगवेगळी. निलगिरी (बिजनोर, उत्तर प्रदेश), कोंथिबीर (झालावाड, राजस्थान), मोहरी (भरतपूर-,कोटा, राजस्थान) कडीपत्ता (होशियारपूर, पंजाब) अशा नानाविध फुलांचे नाना प्रांत आणि तिथला मध वेगवेगळा. अवघ्या चार पाच वर्षात त्यांनी चांगलाच जम बसवलाय. वर्षाकाठी बारा हजार किलो मधाचे उत्पादन त्यांनी सुरु केले आहे. त्याचे स्वतंत्र ब्रॅन्डींग करून त्यांनी हा उद्योग आता विस्तारत नेला आहे. त्यांच्या या धडपडीत पत्नी तेजश्री, आई उषा, सासरे उदय सखदेव, मित्र अमोल पडियार अशा सर्वांची साथ आहे. कुपवाड परिसरात स्वतंत्र उद्योग उभारणीचा त्यांचा प्रयत्न आहे.

शेतकऱ्यांचा मित्र

मधमाशा जलद परागीभवन घडवून आणतात. साहजिकच पीक उत्पादनात वाढते. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून पेट्या आपल्या शिवारात ठेवाव्यात यासाठी मागणी होते. डाळिंब, आंबा, कलिंगड, झुकीनी, काकडी अशा फळभाज्यांच्या शिवारात पेट्या ठेवण्यासाठी राहुल यांना सतत निमंत्रणे असतात. त्यातून व्यवसायाच्या आणखी नव्या वाटा तयार झाल्या आहेत. जांभूळ, निलगिरी, ओवा, लिची, मोहरी, कडीपत्ता, कोंथिबीर या फळे-पिकांमधून मधाचे अधिक संकलन होत असते. त्यामुळे पेट्या ठेवण्यासाठी त्या परिसराची निवड केली जाते असे राहुल यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com