आयुष्यभर साथसंगत; मृत्यूही एकाच दिवशी...नव्वदीतील राम-लक्ष्मणाची जोडी फुटली; माणिकवाडीत परिसरात हळहळ 

विजय लोहार
Tuesday, 22 September 2020

नेर्ले (सांगली)-  भाउबंदकी, किरकोळ कारणावरुन वाद, पिढ्यान पिढ्या संघर्ष हे तसे सार्वत्रिक दिसणारे चित्र. काहीवेळा एकमेकांच्या जीवावर उठण्यापर्यंतच्या घटना समाजात पाहायला मिळतात. अलीकडच्या काही वर्षात तर एकत्र कुटंबपध्दती नष्ट झाल्याने एकोपा अभावानेच आढळतो. मात्र अजूनही काही ठिकाणी एकास ठेच लागली तर दुसऱ्या भावाला त्या वेदना होणारी जीवाला जीव देणारी कुटुंबे आहेत. त्यांच्या बंधूप्रेमाच्या कहाण्याही तितक्‍याच रंजक असतात. मात्र एकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या विरहाचा धसका घेत दुसऱ्यानेही त्याच दिवशी प्राण सोडल्याची घटना माणिकवाडी (ता. वाळवा) येथे घडली. 

पुणे-बेंगलोर महामार्गाच्या पश्‍चिमेला पेठ गावच्या कुशीत वसलेल्या माणिकवाडीतील ही घटना जित्या-जागत्या बंधूप्रेमाचा एक आदर्श नमुना होती. रामचंद्र दादू गडाळे (वय 98) हे ज्येष्ठ असल्याने त्यांच्या शब्दाला तितकाच मान. महादेव दादू गडाळे (वय 90) हे त्यांच्यापेक्षा लहान. परिस्थिती अत्यंत हलाखीची. टोकाची गरीबी दोघांनी जवळून अनुभवली होती. परंपरागत मेंढपाळ व्यवसायात त्यांनी चिकाटीने जम बसवत दुसऱ्या पिढीला पोलिस दलासह व नौदलात भरती करुन देशसेवा करण्याचेही भाग्य संपादन केले. रामचंद्र यांच्यासह चौघा भावांचं प्रेम तितकंच वाखाणण्यासारखं.

चार दिवसापूर्वी रामचंद्र व महादेव हे दोघेही काही दिवसाच्या अंतराने बाथरूममध्ये पाय घसरून पडले. दोघेही घरीच अंथरुणावर पडून होते. भावाला झालेली दुखापत व वेदना महादेव यांना न बघवल्याने सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी प्राण सोडले. तर धाकटा भाऊ डोळ्यासमोर गेल्याच्या घटनेने रामचंद्र यांनीदेखील सायंकाळी जगाचा निरोप घेतला. आयुष्यभर एकमेकांचा आधार बनलेल्या या बंधूंच्या एक्‍झिटमुळे ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी तरळले. जीवापाड प्रेम करणाऱ्या भावा-भावांची जोडी एकाच दिवशी फुटल्याने घर मोकळे झाल्याचा भास कुटुंबियांना होत आहे. भावा-भावांना लाभलेल्या तब्बल 90 वर्षांचा दीर्घ प्रवासाची अखेर झाली. राम-लक्ष्मणाची जोडी काळाच्या पडद्याआड झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lifelong companionship; Death on the same day