esakal | Lockdown Imapact : गावी परतण्यासाठी मजुरांची पायीवारी; मूळगावाची धरली वाट
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown Impact : गावी परतण्यासाठी मजुरांची पायीवारी; मूळगावाची धरली वाट

Lockdown Impact : गावी परतण्यासाठी मजुरांची पायीवारी; मूळगावाची धरली वाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी (बेळगाव) : गतवर्षी लॉकडाउनमुळे अनेकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे यंदा पुन्हा लॉकडाउनला सामोरे जावे लागत आहे. परिणामी भीतीमुळे परराज्यातील अनेक मजुरांनी आपापल्या गावी स्थलांतर करायला सुरूवात केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील अनेक नोकरदार महाराष्ट्रातील विविध शहरात कार्यरत आहेत. अन्य प्रांतातील मजुरांसह ते देखील मोठ्या संख्येने गावी येत आहेत.

गेल्या वेळेसारखा कटु अनुभव टाळण्यासाठी कर्नाटकासह मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड येथील मजुरांनी आपल्या गावी परत जाण्यासाठी पायीवारी सुरू केल्याचे दृश्य कोगनोळी, निपाणी परिसरात दिसत आहे. काही मजूर वाहनांनी देखील आपले गाव गाठत आहेत. महाराष्ट्रातील विविध शहरासह ग्रामीण भागात विविध राज्यातील मजूर व नोकरदार काम करतात. गतवर्षी लॉकडाउनचा धसका घेतल्याने ते सर्व काही सुरळीत झाल्याच्या आशेने डिसेंबर, जानेवारीत पुन्हा कामाच्या शोधात महाराष्ट्रात परतले होते.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. तेथे 1 मे पर्यंत मिनी लाॅकडाउन घोषित केला आहे. सध्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मजूर व नोकरदार आपल्या गावी परतताना दिसत आहेत. त्यापैकी बऱ्याच जणांकडे मास्क, सोशल डिस्टन्स नाही तर कुणाकडे पुरेसा पैसाही नाही. ते कुठल्याही चाचणी, उपचाराशिवाय पुढे जात आहेत. त्यामुळे वाहतूक किंवा शहरे बंद केली तरी संसर्ग टाळता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकार या मजुरांसाठी काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

"गतवर्षी लॉकडाउन होताच वाहतूक व्यवस्था बंद झाली. त्यामुळे कुटुंबाचे हाल झाले. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण कुटुंब व मजुरांसह गावाकडे निघालो आहोत."

- रामकिशोर पटेल, कॉन्ट्रॅक्टर, राजस्थान