Loksabha 2019 : शेट्टींचा अजेंडा फक्त आंदोलनाचाच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

शेट्टींना फक्त विरोध करणे हेच माहीत आहे. विरोध स्वतःच्या स्वार्थासाठी नसावा, तो लोकहितासाठी असावा, हेच त्यांना कळले नसल्याने हा मतदारसंघ १० वर्षे इतर मतदारसंघांच्या तुलनेत मागे राहिला आहे.

शिराळा - शेट्टींना फक्त विरोध करणे हेच माहीत आहे. विरोध स्वतःच्या स्वार्थासाठी नसावा, तो लोकहितासाठी असावा, हेच त्यांना कळले नसल्याने हा मतदारसंघ १० वर्षे इतर मतदारसंघांच्या तुलनेत मागे राहिला आहे. धैर्यशील माने यांना संधी द्या. आम्ही पाच वर्षांचा विचार करत नाही, तर पुढील ५० वर्षांचा विचार करीत आहे. राष्ट्रवादीने लोकांचे बारा वाजवले, तर काँग्रेसने लोकांच्या खिशात हात घालून पाकीटमारी केली. तरुणांनो, आपले पहिले मत देशप्रेम, भक्ती व हितासाठी द्या, असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले.

येथील पोटे चौक येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.

श्री. ठाकरे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीने १५ वर्षे जी पापे केली, ती धुऊन काढण्यात आमच्या सरकारची पाच वर्षे गेली. पुढील पाच वर्षांत आणखी विकास करण्यासाठी आपली सत्ता आणा. विरोधकांनी जातीजातीत व धर्माधर्मांत भांडणे लावण्याचे काम करून आपले हित साधले. अन्नदात्या शेतकऱ्याला कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्ती मिळावी यासाठी सेनेने संघर्ष केला. लोकहितासाठीच सरकार विरोधी बोलत होतो. संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आमचा संघर्ष सुरू राहणार आहे.

शेट्टींची अवस्था पिंजऱ्यातील मास्तरसारखी झाली आहे. फोड कुठे तळव्याला अन्‌ पट्ट्या पिंडरीला, हे नाटक आहे. त्याच्या रक्ताला व फोडाला भाळू नका. विश्वासघातकीला त्याची जागा दाखवा. माझे हात स्वच्छ आहेत म्हणणाऱ्याच्या बाजूला छगन भुजबळांचा फोटो आहे. मग हे स्वच्छ नेते कसे? 

- मंत्री सदाभाऊ खोत

आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, नागभूमीतला असल्याने आम्हाला डिवचले तर सोडणार नाही. इस्लामपूरच्या धाग्यावर येथील दोन बाहुल्या नाचत आहेत. सदाभाऊ तो धागा तोडला की बाहुल्या गप्प बसतील. कारखानदारांच्या मांडीवर बसलेल्यांना कारखानदार कधी संपवतील हे कळणार नाही. वाळवेकरांच्या मांडीवर आतापर्यंत जे बसलेत, त्यांचे काय झाले हे लोकांना माहीत आहे.

धैर्यशील माने म्हणाले, मी खासदार झाल्यावर नागपंचमी पूर्ववत व्हावी म्हणून पहिल्या अधिवेशनात विधेयक मांडणार आहे.

प्रास्ताविक सुखदेव पाटील यांनी केले. यावेळी संतोष हिरुगडे, नीलेश आवटे, भगतसिंग नाईक, विकासराव देशमुख, अभिजित पाटील यांची भाषणे झाली. 

उदयसिंगराव नाईक, रणजितसिंह नाईक, राहुल महाडिक, आनंदराव पवार, सत्यजित कदम, रूपेश चव्हाण, स्वप्नील निकम, पृथ्वीसिंह नाईक, वैभवी कुलकर्णी, राजश्री यादव, सीमा कदम, देवयानी नाईक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Aditya Thackeray comment