Election Results : आमचं ठरलं आणि तसंच घडलं 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

कोल्हापूर - "आमचं ठरलं आणि तसंच घडलं' अशा मजकुराचे फलक आज झळकले आणि गेल्या महिन्यापासून आमचं ठरलंय असे म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आमदार सतेज पाटील यांनी "आमचं ठरलंय'चा नारा दिला.

कोल्हापूर - "आमचं ठरलं आणि तसंच घडलं' अशा मजकुराचे फलक आज झळकले आणि गेल्या महिन्यापासून आमचं ठरलंय असे म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आमदार सतेज पाटील यांनी "आमचं ठरलंय'चा नारा दिला.

कोल्हापूर दक्षिणसह उत्तर आणि करवीरमध्ये एकेका कार्यकर्त्याची मोट बांधली गेली आणि अखेर जे ठरलं तेच घडलं, हे संजय मंडलिक यांच्या निकालावरून स्पष्ट झाले. 

पाटील यांचे महाडिक गटाशी असलेले राजकीय वैर, त्यातून निर्माण झालेल्या ईर्षेचे रूपांतर "आमचं ठरलंय'मध्ये झाले. पाटील हे कॉंग्रेसचे विधान परिषदेचे आमदार. त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. पाटील हे आपल्या निवडणुकीत राबले नव्हते इतका त्यांचा राबता या निवडणुकीत राहिला.

शेवटच्या पंधरा दिवसांत तर रात्री दोन वाजेपर्यंत नियोजनाच्या बैठका चालायच्या. मंडलिक यांच्याकडून रमेश पुरेकर, सुनील मोदी, तर पाटील यांच्याकडून सुभाष बुचडे आणि राष्ट्रवादीचे राजू लाटकर या चर्चेत सहभागी व्हायचे. "आमचं ठरलंय' हे वाक्‍य इतके लोकप्रिय झाले की महाराष्ट्रातही त्याची चर्चा झाली. कोल्हापूर दक्षिण, उत्तर आणि करवीरमध्ये "आमचं ठरलंय'ने अक्षरशः धुमाकूळ घातला. 

कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवाराला उघडपणे पाठिंबा दिला. मंडलिक हे महायुतीचे उमेदवार; मात्र सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली. महिन्याभराच्या काळात मंडलिक एखाद्या तालुक्‍याच्या दौऱ्यावर असले की अन्य तालुक्‍यातील कार्यकर्ते त्यांचा परस्पर प्रचार करत होते. "दादा' आमच्याकडे पदयात्रेसाठी येतील का, अशी विचारणा मंडलिक यांचे स्वीय सहायक अमर पाटोळे यांच्या फोनवर व्हायची. 

कोल्हापूर दक्षिण तसेच उत्तरमधील आमदार पाटील यांची पकड अधिक मजबूत झाली. त्यांचा राग राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नव्हता; मात्र महाडिक यांना या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत धोबीपछाड मारायची या हेतूने पाटील यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते राबले. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव गाफील राहिल्यामुळे झाला, याची सल पाटील तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. ती सल या विजयाच्या निमित्ताने भरून निघाली. हा निकाल जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे.

"आमचं ठरलं तेच करून दाखवलं आणि तसंच घडलं' हे वाक्‍य मात्र कोल्हापूरवासीयांच्या कायमचं ध्यानात राहील. शिवाजी पेठेत ज्या कार्यकर्त्यांनी मंडलिक यांना पाठिंबा दिला त्यांच्या छायाचित्रासह डिजिटल फलक झळकला. सदाशिवराव मंडलिक शिवाजी पेठेत वास्तव्यास होते. प्रा. मंडलिक यांचा जन्म पेठेत झाला. त्यामुळे त्यांना मानाचा मुजरा करत आपलं ठरलंय तसंच घडलंय असा संदेश फलकाच्या माध्यमातून दिला गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Election Result Kolhapur constituency