धनंजय महाडिक यांना नडली सोयीची भूमिका

धनंजय महाडिक यांना नडली सोयीची भूमिका

कोल्हापूर - आम्ही म्हणजेच एक पक्ष आणि आम्ही ठरवेल तीच राजकीय दिशा, या भ्रमात राहिलेल्या खासदार धनंजय महाडिक यांना त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर घेतलेली सोयीची भूमिकाच या निवडणुकीत त्यांना नडल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.  

पाच वर्षांत संसदेत चांगले केलेले काम, सर्वाधिक प्रश्‍न विचारणारा खासदार, अशी निर्माण केलेली ओळख आणि प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याची धमक असूनही श्री. महाडिक यांना सोयीच्या भूमिकेमुळेच या निवडणुकीत लाजिरवाणा पराभव स्वीकारण्याची वेळ आली.

देशात नरेंद्र मोदी हवेत, ही तरुणांची असलेली मानसिकता, ‘आमचं ठरलंय’ म्हणत सतेज पाटील यांनी श्री. महाडिक यांच्या विरोधात उठवलेले रान, ‘महाडिक नको’ ही निर्माण झालेली जिल्ह्यातील लोकांची मानसिकता, ‘गोकुळ’ मल्टिस्टेट प्रकरणात घेतलेला नको तितका सहभाग, श्री. महाडिक यांच्या आजूबाजूच्या लोकांनी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांवर केलेले आरोप आणि पक्षातील सर्वांचा विरोध डावलून दिलेली उमेदवारी ही कारणेही श्री. महाडिक यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. 

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादीतील सर्वच नेत्यांची श्री. महाडिक यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी होती. 
तरीही पक्ष नेतृत्वाने उमेदवारीची माळ श्री. महाडिक यांच्याच गळ्यात घातली. यामुळे पराभूत मानसिकतेतूनच नेते या निवडणुकीला सामोरे गेले. श्री. महाडिक यांना तिकीट दिले तर जागा अडचणीत आहे, ही कल्पना स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना अगोदर दिली होती. त्यातून ही जागा जिंकणे अवघड नव्हे, तर जिंकणारच नाही, अशी मानसिकता या नेत्यांचीच तयार झाली होती. 

चार वर्षांतील खासदार महाडिक यांची भूमिकाही वादग्रस्त राहिली आहे. ते राष्ट्रवादीचे खासदार असूनही भाजपचेच खासदार आहेत का ? असे म्हणण्याइतपत त्यांचा वावर होता. लोकसभा निवडणुकीनंतरच्या सर्वच निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधातच भूमिका घेतली. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप सदस्यांच्या वाहनाचे सारथ्य केले. अशा गोष्टी सामान्य मतदारांना रुचल्या नाहीत. सगळीकडे महाडिकच का? हा ‘अँटी महाडिक’ फॅक्‍टरही या पराभवाला कारणीभूत ठरला. त्यातून ‘महाडिक नको’ ही मानसिकता लोकांची तयार झाली आणि त्याचे प्रतिबिंब निकालात उमटले. वेगवेगळ्या पक्षात जाऊन सगळ्या सत्ता आपल्याच हातात ठेवायची वृत्ती, त्यातूनच यावेळी महाडिकांना थांबवायचे, हे जनमत तयार झाले होते.

‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटच्या भूमिकेत खासदारांनी घेतलेली भूमिकाही लोकांना रुचली नाही. संघ मल्टिस्टेट झाला तर त्यांच्याच मालकीचा होईल, असा संदेश यातून गेला, त्याचाही फटका श्री. महाडिक यांना बसला. त्यात श्री. महाडिक यांच्या अवतीभोवती असलेल्यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याच संपत्तीच्या चौकशीची केलेली मागणी, महापालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नूषांच्या पराभवासाठी याच लोकांनी लावलेली फिल्डिंग, राष्ट्रवादीचे तत्कालिन शहराध्यक्ष राजू लाटकर यांच्या घरावर महाडिक यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला, या हल्ल्यावेळी श्री. मुश्रीफ यांच्याच वाहनांवर दगडफेकीचा प्रयत्न यातून मुश्रीफ, ए. वाय. यांचे कार्यकर्तेही दुखावले होते. त्याची प्रतिक्रियाही कागलच्या सभेत उमटली होती. त्यामुळे मुश्रीफ, ए. वाय. यांनी सांगूनही कार्यकर्त्यांनी त्यांचे ऐकले नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. 

‘आमचं ठरलंय’ म्हणत आमदार सतेज पाटील यांनी श्री. महाडिक यांच्या विरोधात शड्डू ठोकला. त्यांचा विरोध राहील; पण तेवढ्या ताकदीने प्रचारात उतरून यंत्रणा हाताळतील, असे श्री. महाडिक यांना वाटले नाही. त्यामुळे त्यांनाही गांभीर्याने घेतले गेले नाही किंवा त्यांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न महाडिक किंवा पक्ष नेतृत्वाच्या पातळीवरही झाला नाही. त्यामुळे प्रा. मंडलिक हे काँग्रेसचेच उमेदवार असल्यासारखाच प्रचार श्री. पाटील यांनी केला. त्यातून मोठी रसद प्रा. मंडलिक यांच्या मागे राहिली.

या निवडणुकीत थेट मोदी लाट नव्हती; पण देशात मोदीच हवेत, ही भावना तरुणांत जास्त होती, त्यातूनही मोठे मताधिक्‍य प्रा. मंडलिक यांना दिले. त्यामुळेच समोर उमेदवार कोण, हे तरुणांनी बघितले नाही, काम कोणी चांगले केले, याचाही लेखाजोखा त्यांनी लक्षात घेतला नाही, त्याचा परिणाम म्हणून मंडलिक विक्रमी मताधिक्‍क्‍यांनी विजयी झाले. 

भाजप-सेना युती झाल्यानंतर सर्वांनीच एकत्रित चांगले काम केले. भविष्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके यांनी प्रचारात कोठेही कसर ठेवली नाही. शेवटच्या टप्प्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सगळी सूत्रे हातात घेऊन ‘करो या मरो’चा संदेश देत आपले सर्वस्व पणाला लावले.

या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून एवढा मोठा विजय मंडलिक यांच्या पदरात पडला. त्यात त्यांच्या वडिलांची पुण्याईही कामी आली. दुसरीकडे व्यक्‍तिगत कर्तृत्व चांगले असून, गेल्या पाच वर्षांत संसदेत चांगले काम करून, आणि ५० वर्षांत पहिल्यांदा कोल्हापूरचा दबदबा दिल्ली दरबारात निर्माण करूनही केवळ सोयीच्या भूमिकेमुळे श्री. महाडिक यांना पराभवाची चव चाखावी लागली.  

नेत्यांतही ईर्ष्या दिसली नाही
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत श्री. मुश्रीफ यांनी खासदार महाडिकांसाठी पायाला भिंगरी बांधली होती; पण या वेळच्या निवडणुकीत श्री. मुश्रीफ असो किंवा पक्षाचे इतर नेते हे त्या इर्ष्येने किंवा जिद्दीने मैदानात उतरलेच नाहीत. हे मैदान जिंकायचेच आहे, अशी ईर्ष्याही या नेत्यांत दिसली नाही. हा या वेळच्या निवडणुकीतील ठळक फरक जाणवला. 

सेनेशी प्रामाणिक राहिल्याचे फळ
लोकसभा निवडणूक शिवसेनेने नेहमीच उसन्या उमेदवारांवरच लढवली; पण निकालाच्या दुसऱ्या दिवशी त्या वेळच्या उमेदवारांनी भगवा खाली ठेवला; पण याला प्रा. मंडलिक अपवाद ठरले. गेल्या निवडणुकीत पराभूत होऊनही पाच वर्षे प्रा. मंडलिक सेनेसोबत प्रामाणिक राहिले. मध्यंतरी त्यांना राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण मुश्रीफ यांनी दिले; पण त्याला नम्रपणे नकार देत ते सेनेचेच काम करत राहिले. ही त्यांच्या विजयातील एक जमेची बाजू ठरली. 

‘आमचं ठरलंय’ हे होणारच होतं
महाडिक-सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष बघता काहीही झाले तरी आमदार सतेज पाटील हे महाडिक यांना मदत करणार नाहीत, याची खात्री होती. त्यामुळे आपण कोठूनही लढलो तर श्री. पाटील यांची मदत होणारच, याची खात्रीही प्रा. मंडलिक यांना होती. ज्या वेळी श्री. महाडिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली, त्याच वेळी श्री. पाटील यांनी ‘आपलं ठरलंय’ म्हणत त्यांना विरोध सुरू केला आणि प्रा. मंडलिक यांना जी खात्री होती, त्याचप्रमाणे श्री. पाटील यांचीही मदत त्यांना झाली. 
...............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com