Loksabha 2019 : फंटास्टिक साहेब अन्‌ फॅन्सी नंबर...!

संदीप खांडेकर
बुधवार, 17 एप्रिल 2019

दुचाकी असो किंवा चारचाकी. तिचा नंबर फॅन्सीच पाहिजे. कोणासाठी काही आकडे ‘लकी’ असतात. त्यामुळे गाडीच्या नंबरात हे आकडे पाहिजेत, असाच अनेकांचा आग्रह असतो. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारही त्याला अपवाद नाहीत. ज्या रस्त्यावरून त्यांची गाडी जाईल, तेथे कार्यकर्त्यांना केवळ गाडीचा नंबर पाहण्याचा अवकाश. त्यांना आपल्या भागात उमेदवार आल्याचे लगेच कळते. काही नेत्यांसाठी हे नंबर इतके लकी ठरतात की, घरात दुसरी गाडी घ्यायची म्हटले तर तोच नंबर त्यांच्या गाडीवर झळकतो. नेत्याच्या गाडीचा जो नंबर आहे, तोच नंबर आपल्या गाडीला असावा, या भावनेतून कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर  झळकतात, हेही विशेषच.

धनंजय महाडिक (राष्ट्रवादी काँग्रेस)
महाडिक यांच्या गाडीचा नंबर एमएच ०९ डीएक्‍स ५५७७ आहे. त्यांची जन्मतारीख १५ जानेवारी असून, या अंकांची बेरीज सहा होते. महाडिक यांच्यासाठी सहा नंबर लकी आहे. त्यांच्याकडे एकूण अठरा गाड्या असल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेल्या संपत्ती विवरण पत्रात आहे. त्यापैकी टाटा सफारी, आय टेन, लॅन्ड रोवर, मर्सिडीज बेंझ, लेलॅंड, स्कोडा सुपर्ब, मर्सिडीज बेंझ जीएलएस, टोयाटो, इनोव्हा यांचे नंबर ५५७७ असेच आहेत. या गाड्यांच्या नंबरची बेरीज केली असता ती सहाच होते. त्यामुळे त्यांच्या घरी दुचाकी असो किंवा चारचाकी त्या गाडीचा नंबर असाच ठेवला आहे, असे त्यांचे पी. ए. दत्तात्रय आवळे सांगतात.

प्रा. संजय मंडलिक (शिवसेना भाजप युती)
प्रा. मंडलिक यांच्या संपत्ती विवरणपत्रात तीन गाड्यांची नोंद आहे. डस्टर एम एच ०९-सीजे ९९९९, ॲक्‍टिव्हा एमएच ०९ बीटी ९९९, यामाहा एम एच ०९ सीपी ९९९९ असा नंबर आहे. विशेष म्हणजे त्यांच्या प्रचारासाठी असलेल्या गाडीचा नंबर एमएच ०९-ईजी ११९९ असा आहे. ती गाडी त्यांच्या मित्राची असून, त्याने ती प्रा. मंडलिक यांच्या प्रचारासाठी वापरण्यास दिली असल्याचे पी. ए. अमर पाटोळे यांनी सांगितले.

धैर्यशील माने (शिवसेना-भाजप युती)
माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात उतरले आहेत. त्यांच्या गाडीचा क्रमांक एमएच सीएम ११ असा असून, या गाडीच्या नंबराच्या प्रेमात त्यांचे कार्यकर्तेही आहेत. त्यामुळे असाच नंबर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांनाही आहे. हा नंबर त्यांनी घेण्यामागे एक विशेष कारण आहे. ते म्हणजे माजी खासदार निवेदिता माने यांची जन्मतारीख ११ एप्रिल आहे, असे पी. ए. अमोल कोरे यांनी सांगितले.

राजू शेट्टी  (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
शेट्टी यांच्या गाडीचा नंबर एमएच ०९-ईई ७२२७ असून, तो लकी आहे म्हणून त्यांनी घेतलेला नाही. या नंबरमधून ‘साथ दो दो साथ’ असा अनोखा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. शेट्टी निवडणुकीच्या प्रचारासाठी या गाडीतून हातकणंगले मतदार संघ पिंजून काढत आहेत. या गाडीचा नंबर कोणाला माहीत नाही, असे नाही. ज्या भागातून ही गाडी प्रवास करते त्यावेळी तिथल्या लोकांना शेट्टी यांची ही गाडी असल्याचे सहज लक्षात येते. गाडीचा नंबर शेट्टी यांची ओळख बनल्याचे त्यांचे पी. ए. स्वस्तिक पाटील स्पष्ट करतात.

Web Title: Loksabha 2019 Fantastic Saheb and fancy number