Loksabha 2019 : तुम्हीच आमच्या नादाला लागू नका - गाैरव नायकवडींचा जयंत पाटलांना इशारा

शांताराम पाटील 
बुधवार, 17 एप्रिल 2019

इस्लामपूर - आम्ही इंग्रजांना घालवलेली माणसं आहोत, ज्यानं दुसर्‍याचं लुबाडलेलं असतं त्यालाच गमवायची भिती असते, त्यामुळे तुम्हीच आमच्या नादाला लागू नका, असा प्रतिइशारा क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांनी जयंत पाटील यांना त्यांच्या कासेगावात जाऊन दिला.

इस्लामपूर - आम्ही इंग्रजांना घालवलेली माणसं आहोत, ज्यानं दुसर्‍याचं लुबाडलेलं असतं त्यालाच गमवायची भिती असते, त्यामुळे तुम्हीच आमच्या नादाला लागू नका, असा प्रतिइशारा क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांनी जयंत पाटील यांना त्यांच्या कासेगावात जाऊन दिला. गौरव नायकवडींच्या या भुमिकेमुळे शांत व संयमी म्हणून ओळख असलेले वाळव्याचे नायकवडी ‘ इट का जवाब पत्थरसे देंगे ’ या भुमिकेवर आले असल्याचे स्पष्ट झाले. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ वाळवा गावात आयोजित सभेत नायकवडींना माझ्या नादाला लागू नका, आहे ते सर्व गमावून बसाल असा दम दिला होता. यानंतर वाळवा तालुक्यात उलटसुलट चर्चा चालू झाल्या होत्या. याला नायकवडी आपल्या सवयीप्रमाणे शांत बसणार का जशास तसे उत्तर देणार या बाबत उत्सुकता होती. मात्र नागनाथअण्णांचे नातू गौरव नायकवडी यांनी जयंत पाटील यांच्या धमकीला जयंत पाटील यांच्या जन्मभुमी कासेगावमध्ये जाऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. यापुढे या प्रत्युत्तरातून ‘ इट का जवाब पत्थरसे देंगे ’ असा पवित्रा नायकवडी यांचा असल्याचे दिसून आले.

11 एप्रिलला वाळव्यात जयंत पाटील यांची प्रचारसभा झाली. खुद्द वाळव्यात होत असलेल्या या सभेत नायकवडी गटाला टार्गेट करुन जयंत पाटील यांनी ‘ माझ्या नादाला लागू नका ’ अशा भाषेत जोरदार इशारा दिला होता. जयंत पाटलांचा विरोध तुम्ही अजून पाहिला नाही. जेव्हा विरोध करु तेव्हा सारेच गमवाल. मी केवळ गोडच बोलत नाही.

क्रांतिवीर नागनाथअण्णांचा विचार वारसांनी सोडू नये, नाही तर 15 गावातील जनता तुम्हाला सोडेल असेही त्यांनी सुचित केले होते. त्यांच्या या भाषणाची क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. त्यामुळे वाळव्यासह जिल्ह्यात या इशार्‍याची चर्चा होती. जयंत पाटील यांनी वाळव्यात येऊन नायकवडी गटाला इशारा दिल्याच्या पार्श्‍वभुमीवर गौरव नायकवडी यांनी जयंत पाटलांना त्यांच्याच कासेगावात आयोजित प्रचारसभेत प्रतिइशारा दिला. 

कासेगाव येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांची प्रचारसभा झाली. या सभेत गौरव नायकवडी म्हणाले, “ वाळव्याचे माजी मंत्री परवा वाळव्यात आले होते. आम्ही सारं गमवू असा त्यांचा इशारा होता. पण ज्यानं दुसर्‍याचं लुबाडलेलं असतं त्यालाच गमवायची भिती असते. सांगली जिल्ह्यात कुणी कुणाला लुबाडलं हे सार्‍या जिल्ह्याला माहिती आहे. तुमची विचारसरणी काय आहे हेही सार्‍या जनतेला माहित आहे.

जिल्ह्यातील एकही पुढारी त्यांच्याजवळ राहिलेला नाही. जे जे त्यांच्याजवळ आले त्या सर्वांचा ‘ कार्यक्रम ’ झाला. त्यांची विश्‍वासार्हता पूर्णपणे संपली आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. आमचा इतिहास फार मोठा आहे. आम्ही इंग्रजांना घालवलेली माणसं आहोत, त्यामुळे तुम्हीच आमच्या नादाला लागू नका.”

गौरव नायकवडींच्या या भाषणाची क्लीप ‘ ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी ’ या मजकुरासह व्हायरल होत आहे. त्यामुळे आता पुढे कोण कुणाचा नाद करणार या विषयी सर्वांच्यात उत्सुकता आहे. ज्या प्रमाणे जयंत पाटील यांच्या वाळव्यातील वक्तव्याची व्हीडीओ क्लीप व्हायरल होत होती त्या प्रमाणे गौरव नायकवडींच्या या वक्तव्याची क्लीप सोशल मिडीयावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.

Web Title: Loksabha 2019 Gourav Naikwadi comment on Jayant Patil