Loksabha 2019 : कोल्हापूर मतदारसंघातून १५, तर हातकणंगलेतून १७ उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

एक नजर

  • लोकसभा निवडणुकीत अर्ज माघारीनंतर दोन्ही मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट
  • कोल्हापूर मतदारसंघातून १५, तर हातकणंगलेतून १७ उमेदवार रिंगणात
  • कोल्हापुरातून सात, तर हातकणंगलेतून तीन अशा दहा जणांची माघार
  • दोन्ही मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान
  • जाहीर प्रचाराची सांगता २१ एप्रिलला सायंकाळी 

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत अर्ज माघारीनंतर दोन्ही मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. कोल्हापूर मतदारसंघातून १५, तर हातकणंगलेतून १७ उमेदवार रिंगणात आहेत. कोल्हापुरातून सात, तर हातकणंगलेतून तीन अशा दहा जणांनी आपले अर्ज मागे घेतले. 

दोन्ही मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून, उद्यापासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत प्रचाराचा धुरळा उडणार आहे. जाहीर प्रचाराची सांगता २१ एप्रिलला सायंकाळी होईल. डमी उमेदवार म्हणून अर्ज भरलेल्या खासदार धनंजय महाडिक यांच्या पत्नी सौ. अरुंधती व शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या पत्नी सौ. वैशाली यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की छाननीमध्ये कोल्हापूरातुन २२ आणि हातकणंगलेत २० अर्ज वैध ठरले होते. आज कोल्हापूरमधून सात आणि हातकणंगलेमधून तीन जणांनी माघार घेतली. अर्ज माघारीनंतर चिन्हांचे वाटप झाले.

कोल्हापुरात १५ उमेदवार असले तरी खरी लढत राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक आणि प्रा. संजय मंडलिक यांच्यात आहे. हातकणंगलेत खासदार राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने यांच्यातच चुरस आहे. कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुणा माळी आणि बसपाचे डी. श्रीकांत यांचेही आव्हान असेल. दोन्ही उमेदवार किती मते घेणार, याविषयीही उत्सुकता आहे.   

रिंगणातील उमेदवार
कोल्हापूर - खासदार धनंजय महाडिक-राष्ट्रवादी, प्रा. संजय मंडलिक-शिवसेना, सौ. अरुणा माळी-वंचित बहुजन आघाडी, दुंडाप्पा श्रीकांत-बसपा, किसन काटकर-बळीराजा, दयानंद कांबळे-बहुजन रिपब्लिकन पार्टी, नागरत्न सिध्दार्थ-बहुजन मुक्ती पार्टी आणि परेश भोसले, बाजीराव नाईक, अरविंद माने, मुस्ताक मुल्ला, युवराज देसाई, राजेंद्र कोळी, संदीप संकपाळ, संदीप कोगले (सर्व अपक्ष)

हातकणंगले -  खासदार राजू शेट्टी-स्वाभिमानी पक्ष, धैर्यशील माने-शिवसेना, अस्लम सय्यद-वंचित बहुजन आघाडी, डॉ. प्रशांत गंगावणे-बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, मदन सरदार-बहुजन मुक्ती पार्टी, राजू मुजिकराव शेट्टी- बहुजन महापार्टी आणि आनंदराव सरनाईक, विद्यासागर ऐतवडे, विश्‍वास कांबळे, किशोर पन्हाळकर, डॉ. नितीन भाट, रघुनाथदादा पाटील, महादेव जगदाळे, विजय चौगुले, संग्रामसिंह गायकवाड, संजय अग्रवाल (सर्व अपक्ष)

हातकणंगलेत दोन यंत्रे लागणार
कोल्हापूरमध्ये एकाच मतदान यंत्रावर मतदान होईल, तर हातकणंगलेमध्ये दोन यंत्रे जोडावी लागणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

यांनी घेतली माघार

कोल्हापूर लोकसभा - सौ. अरुंधती धनंजय महाडिक, सौ. वैशाली संजय मंडलिक, महाराष्ट्र क्रांती सेनेचे उमेदवार भरत पाटील, सुशांत दिगे, महेश कांबळे, यशवंत शेळके  आणि सलीम बागवान. 

हातकणंगले लोकसभा - महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, स्वाभिमानीचे प्रा. जालंधर पाटील आणि सूर्यकांत चिडचाळे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Kolhapur, Hatkanagale Lok Sabha Constituency