Loksabha 2019 : ‘लोकांच्या नजरेतून लोकसभेचा जाहीरनामा’ प्रमुख राजकीय पक्षांना 'सकाळ'कडून सादर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

कोल्हापूर - जिल्ह्याचा विकासामध्ये लोकांना नेमके काय पाहिजे. त्यांच्या मागण्या काय आहेत, याचा दस्तऐवज असलेले ‘लोकांच्या नजरेतून लोकसभेचा जाहीरनामा’ ही पुस्तिका आज जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांकडे प्रदान केली.

कोल्हापूर - जिल्ह्याचा विकासामध्ये लोकांना नेमके काय पाहिजे. त्यांच्या मागण्या काय आहेत, याचा दस्तऐवज असलेले ‘लोकांच्या नजरेतून लोकसभेचा जाहीरनामा’ ही पुस्तिका आज जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांकडे प्रदान केली. सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या हस्ते पुस्तिका प्रदान केली. निवडणुकीत लोकांच्या या मागण्यांचा विचार, चर्चा करून त्यांचे हे प्रश्‍न सोडवावेत, अशी मागणी पक्षांना केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार उपस्थित होते.
 

निवडणुकीत लोकांच्या विकासाच्या मागण्यांचा विचार बाजूला जाऊन एकमेकांवरील व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी 
सध्या उडत आहेत. यात विकासाचे मुद्दे बाजूला जात आहे. जिल्ह्याचा विकासात नेमके लोकांना काय हवे आहे, याचा माहिती 

‘सकाळ’ने गोळा केली. विविध १६ सेक्‍टरमधील तज्ज्ञ लोक, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सूचना केल्या. सूचनांची पुस्तिका आज पक्षाच्या प्रमुखांना दिली.

श्रीराम पवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात हा उपक्रम ‘सकाळ’ राबवते. निवडणुका सुरू झाल्या की लोक हिताचे प्रश्‍न बाजूला राहतात आणि वेगळाच मुद्दा पुढे येतो. पाच वर्षे वेगवेगळ्या विषयावर बोलत रहायचे आणि प्रत्यक्ष निवडणूक विशिष्ट गोष्टीभोवती फिरत राहते. उद्योजकांसह विविध क्षेत्रांतील लोकांच्या विकासाबाबतच्या कल्पना असतील तर त्याला राजकीय व्यवस्थेने प्रतिसाद द्यायला पाहिजे. निवडून कोणीही येवो, अशा प्रश्‍नांना पक्षांच्या जाहीरनाम्यात स्थान दिले पाहिजे. ‘सकाळ’ गेली पाच वर्षे 

महापालिकेच्या अर्थसंकल्पात लोकांच्या काय अपेक्षा असाव्यात हे मांडते, त्याचे प्रतिबिंब पालिकेच्या अर्थसंकल्पात दिसावे ही अपेक्षा असते. या उपक्रमामागेही सामुदायिक शहाणपणातून आलेल्या चार गोष्टी पक्षांपर्यंत पोचवण्याचा 
हेतू आहे.’’

मुख्य प्रतिनिधी सुधाकर काशीद यांनी प्रास्ताविक केले. ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, निवासी संपादक (सकाळ सेवाभक्ती) निखिल पंडितराव उपस्थित होते. निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी आभार मानले.

लोकांनी सुचवले आणि आम्हाला सांगितले हा ‘सकाळ’चा उपक्रम चांगला आहे. लोक निवडणुकीकडे कोणत्या नजरेतून पाहतात, त्यांच्या आशा-आकांक्षाचे संकलन करून आमच्यापर्यंत पोचवल्या. या अपेक्षांचा सहभाग नक्कीच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात करून आणि हे प्रश्‍न सोडवण्यासाठी पाठपुरावाही करू.
- प्रकाश आवाडे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

उपक्रमात ‘सकाळ’ नेहमीच अग्रेसर असते. मतदार जागृतीचा ‘सकाळ’ने घेतलेला कार्यक्रमही चांगला होता. त्याचप्रमाणे लोकांच्या अपेक्षा सरकारकडून काय आहेत, हे या जाहीरनाम्यातून सांगण्याचा प्रयत्न झाला. आमच्या पक्षाच्या पातळीवरही या मागण्यांचा जरूर विचार करू.
- संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष भाजप

निवडणुकीतून जनतेला काय हवे, काय नको हे आमच्यापर्यंत पोचवण्याचे काम ‘सकाळ’ने केले आहे. पक्षाच्या जाहीरनाम्यातून विकासाच्या या कल्पना मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील. जनतेच्या जाहीरनाम्यातील सूचनांचा अभ्यास करून लोकांचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करू.
- ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष,  राष्ट्रवादी काँग्रेस 

विविध प्रश्‍नांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करतो; पण नंतर ते प्रश्‍न सुटले का नाही, हे पाहत नाही. मूलभूत सुविधा तशाच आहेत, थेट पाईपलाईन, अंबाबाई मंदिर आराखडा यांसारखे प्रश्‍न कोण सोडवणार? प्रशासनासह आमचेही हे अपयश आहे. निवडणुकीतून हे प्रश्‍न बाजूलाच जातात. या पार्श्‍वभूमीवर जनतेचा हा जाहीरनामा दिशादर्शक आहे, त्यातील तरतुदींचा समावेश शिवसेनेच्या जाहीरनाम्यातही असेल.
संजय पवार, जिल्हाध्यक्ष, 
शिवसेना, उपाध्यक्ष, अण्णासाहेब विकास महामंडळ

 

 

Web Title: Loksabha 2019 Loksabha manifesto from peoples eyes