Loksabha 2019 : विकासकामांची शिदोरीवरच अन् जनतेच्या विश्‍वासावरच विजयी होईन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

कोल्हापूरच्या जनतेने २०१४ मध्ये देशभर मोदी लाट असतानाही माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला विजयी केले. जनतेने दाखविलेल्या या विश्‍वासाच्या बुस्टरवरच लोकसभेत कोल्हापूरचा ठसा उमटवला. खासदाराने प्रश्‍न विचारणे, निधी आणणे आणि कायदे करण्यासाठी अभ्यासपूर्ण मांडणी करण्याचे महत्त्वाचे काम असते. पाच वर्षांत विविध प्रश्‍न मांडले. जिल्ह्याच्या विकासामध्ये ८ हजार कोटी रुपयांचा निधी आपण आणला. जनतेचा विश्‍वास सार्थ ठरवला. या कामाच्या शिदोरीवरच यंदाच्या निवडणुकीत मी जनतेसमोर जात आहे. ‘आपला माणूस’ म्हणून जनतेने मला स्वीकारले असल्याने या निवडणुकीतही मलाच विजयी करतील, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

खासदार महाडिक म्हणाले, ‘‘२०१४  मध्ये देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेत भलेभले दिग्गज नेते पराभूत झाले. परंतु, कोल्हापुरातील जनतेने आपल्या पारड्यात मतांचा जोगवा घातला आणि एक ऐतिहासिक विजय खेचून आणला. २०१४ पूर्वी दहा वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक सेवेची दखल जनतेने घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह मित्रपक्षांची साथही मिळाली. खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदारांची कामे समजावून घेण्यापासून पूर्ण अभ्यास केला. त्यामुळेच लोकसभेत प्रश्‍न मांडायचे कोल्हापूरकरांची मान देशभरात उंचावेल, अशा पद्धतीने काम केले. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे प्रकल्प मार्गी लागला.

कोल्हापूरच्या विमानसेवेचा उडानमध्ये समावेश करून घेतल्याने विमानसेवा सुरू झाली. शहराच्या प्रवेशद्वारावर बास्केट ब्रीजसाठी निधी मंजूर झाला, आता पुढील कार्यवाही होईल. इएसआय रुग्णालय, पासपोर्ट कार्यालय, बीएसएनल टॉवर उभारणे, शिवाजी पुलाचा कायदा बदलण्याचा प्रश्‍न, खेलो इंडियामधील प्रश्‍न असे विविध प्रश्‍न उपस्थित करून त्यांची सोडवणूक करून विकासाची नवे दारे खुली केली. सॅनिटरी नॅपकीन, रेल्वेतील महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही, शैक्षणिक कायद्यातील बदल असे देशपातळीवर निर्णय बदलण्यासाठी सरकारला भाग पाडले. परदेशातील अनेक देशांच्या उच्चायुक्तांबरोबर चर्चासत्रात सहभाग घेतला. परदेशातील अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला. कोल्हापूरकरांचा एक प्रतिनिधी म्हणूनच सर्वोत्कृष्ट कामगिरी दाखवण्यात यश आले.’’

मला निवडून आणण्यासाठी सर्वच घटक पक्षातील लोकांची मदत लाभल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘मी पक्षविरोधी भूमिका किंवा काम केल्याचा गैरसमज विरोधकांकडून पसरवला जात आहे. माझ्यासाठी ज्यांनी काम केले तेच विविध निवडणुकीत विरोधात उभे ठाकले. अशा परिस्थितीत मी एकाची बाजू घेणे योग्य नव्हते म्हणूनच मी शांत बसलो. या सर्वांशी बोलून मी हा गैरसमज दूर केला आहे. पक्षविरोधी मी भूमिका घेतली असती, तर खासदार शरद पवार यांनी आपल्याला पुन्हा निवडणुकीसाठी तिकीट दिले असते का? खासदार श्री. पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी वर्षभर एकत्रित येऊन केंद्रातील सरकारविरोधी मोट बांधली आहे. त्यांच्या प्रयत्नांतून महागंठबंधन तयार झाले. देशभर केंद्र सरकारविरोधी लाट आहे. परंतु, कोल्हापुरातील काही जणांनी खासदार श्री. पवार आणि श्री. गांधी यांचा संदेश ऐकला नाही. त्यांची भूमिका वेगळी आहे; परंतु काँग्रेस ताकदीने काम करत आहे.’’ 

हे करणार 

  •  तरुणांसाठी स्थानिक पातळीवर आयटी कंपन्यांसारख्या नोकरी  
  •  इंटरनॅशनल कन्व्हेशन सेंटर 
  •  क्रीडा क्षेत्रासाठी सुविधा 
  •  स्थानिक खेळाडूंकडे कौशल्य आहे, पण सुविधा नाहीत. त्यांना सुविधा   विमानतळाचा विकास 
  •  एम्सच्या धर्तीवर एखादे चांगले सरकारी रुग्णालय  
  •  काजू-चप्पल यासाठी क्‍लस्टर योजना
  •  पर्यटन विकास व रोजगारनिर्मितीसाठी 
  •  केंद्रीय विद्यालय
  •  रेल्वे स्थानकाचा विकास

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 MP Dhananjay Mahadik interview