Loksabha 2019 : भाजपच्या काळात बेकारीचा उच्चांक : मलिक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

‘‘पाच वर्षांत कधी नव्हे इतकी बेकारी वाढली आहे. आजपर्यंतच्या बेकारीचा उच्चांक या शासनाच्या कालावधीत झाला. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील जनतेच्या मनात चीड निर्माण झाली आहे. ते सरकारच्या विरोधात बोलू लागले आहेत. सरकार विरोधातील जनमत त्रासदायक ठरू लागल्यानेच आता भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांची बदनामी करण्याचे षड्‌यंत्र सुरू केले आहे.’’

कोल्हापूर - देशातील एकूण परिस्थिती भाजपला अनुकूल नाही. त्यामुळेच पुन्हा सत्ता येईल का, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्री. मलिक म्हणाले, ‘‘पाच वर्षांत कधी नव्हे इतकी बेकारी वाढली आहे. आजपर्यंतच्या बेकारीचा उच्चांक या शासनाच्या कालावधीत झाला. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील जनतेच्या मनात चीड निर्माण झाली आहे. ते सरकारच्या विरोधात बोलू लागले आहेत. सरकार विरोधातील जनमत त्रासदायक ठरू लागल्यानेच आता भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांची बदनामी करण्याचे षड्‌यंत्र सुरू केले आहे.’’ मात्र भाजपने कितीही आटापिटा केला तरी त्यांना १६० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असे भाकीत मलिक यांनी केले.

ते म्हणाले, ‘‘लोकशाही संपविण्याचा डाव मोदी सरकार खेळत आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या मुस्कटदाबीचा हा प्रकार आहे; मात्र त्यांची ही मुस्कटदाबी जास्त काळ चालणार नाही.’’ आगामी निवडणुकीत भाजपची सत्ता येणार, असे ‘ओपिनियन पोल’ येणार असल्याचे सांगितले जात आहे. खरं तर हा ‘ओपिनियन पोल’ नसून ‘मेकिंगपोल’ आहे, असा टोलाही मलिक यांनी लावला. तसेच भाजपला गोळवलकर आणि हेडगेवार यांचा राष्ट्रवाद अपेक्षित असल्याची टीका त्यांनी केली. भाजपची यावेळची अवस्था ही ‘शायनिंग इंडिया पार्ट टू सारखी असेल,’ असा टोलाही त्यांनी लगावला. 

जनताच ‘चंपा’ची चमकोगिरी संपवणार
जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील उर्फ ‘चंपा’ यांची चमकोगिरी अतीच होत आहे. ही चमकोगिरी संपवण्याचे काम येथील जनताच करेल. सत्तेचा दुरुपयोग करून प्रत्येकाला अडचणीत आणण्याचे काम मंत्री पाटील यांच्याकडून केले जात आहे. काही लोकांवर दबाव टाकून भाजपकडून प्रचार करण्यास भाग पाडले जात आहे. मात्र आजपर्यंत लोकसभेच्या आठ जागांपेक्षा जादा जागा न मिळालेल्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत दुप्पट जागा मिळतील, असा दावाही मलिक यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Nawab Malik comment