Loksabha 2019 : अमित शहा तासगावमध्ये; फडणवीस संखला बरसणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

एक नजर

  • भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार  दाैरा बुधवारी (ता. १७). 
  • श्री. शहा यांची तासगावमध्ये सकाळी दहाला, तर श्री. फडणवीस यांची संख (ता. जत) येथे दुपारी दोनला सभा
  • दोन्ही ठिकाणी जोरदार तयारी
  • भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ सभा

सांगली - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराने बुधवारी (ता. १७) जिल्हा ढवळून निघणार आहे. श्री. शहा यांची तासगावमध्ये सकाळी दहाला, तर श्री. फडणवीस यांची संख (ता. जत) येथे दुपारी दोनला सभा होईल. दोन्ही ठिकाणी जोरदार तयारी सुरू असून, भाजपसाठी हा प्रचाराचा सुपर धमाका असणार आहे. 

भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ सभा होतील. तासगाव येथील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात अमित शहा तोफ डागतील. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन वेळा श्री. शहा यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला होता. अखेर या वेळी ते तासगावमध्ये येत असून, कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण आहे. गृह राज्यमंत्री रणजित पाटील उपस्थित राहतील. 

जत तालुक्‍यातील मतांची समीकरणे लक्षात घेत देवेंद्र फडणवीस यांचा दौरा संख येथे नियोजित केला आहे. जत तालुक्‍यात राज्य सरकारकडून शेतीच्या पाणी योजनांसाठी केलेल्या विविध कामांचा ऊहापोह केला जाईल. वंचित ४२ गावांसाठी खास ग्वाही या वेळी अपेक्षित असेल. सध्या जत तालुका दुष्काळाने होरपळत असून, मुख्यमंत्री काय बोलणार, याकडे लक्ष असेल.

शहा यांचा सांगली जिल्हा दौरा अखेर निश्‍चित

तासगाव - अनेक महिन्यांपासून रखडलेला भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा सांगली जिल्हा दौरा अखेर निश्‍चित झाला आहे. येथे बुधवारी (ता. १७) त्यांची जाहीर सभा होणार आहे. खासदार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी ते येणार आहेत.  

लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली  आहे. काँग्रेस आघाडीच्या उमेदवार विशाल पाटील  यांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार तासगावात आले  होते. आता त्या पाठोपाठ शहा येत असल्याने पुन्हा  एकदा तासगाव निवडणूक रणभूमी होणार असे चित्र  आहे.

साडेचार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींचीही विधानसभा निवडणुकीत सभा झाली होती. जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते होणार होते. मात्र ते आजारी पडल्याने दौरा रद्द झाला होता. त्यानंतर त्यांचा सांगली येथील कार्यकर्ता मेळावाही रद्द झाला होता.

प्रचाराच्या निमित्ताने शहा तासगावात प्रथमच येत आहेत. त्यांच्या सभेची तयारी सुरू झाली आहे. तासगाव- सांगली रस्त्यावरील क्रीडा संकुल किंवा विद्यानिकेतन शाळेच्या मैदानात ही सभा होण्याची शक्‍यता आहे. पोलिसांकडे दौऱ्याबाबत सूचना आल्या नसल्या तरी पक्षीय पातळीवर सभेची  तयारी सुरू झाली आहे. क्रीडासंकुलाच्या मैदानाची परवानगी घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Sangli Constituency Amit Shah in Tasagaon Fadnavis in Shankh