Loksabha 2019 : ना तोफ है, ना बारूद !

Loksabha 2019 : ना तोफ है, ना बारूद !

गुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ, विकासाचा बॅकलॉक, उद्योग, रोजगार आणि रेल्वे, महामार्ग असे पायाभूत सुविधांचे विषय होते. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे नेते गेल्यावेळी प्रचारात असतानाही मोदी लाटेला ते देखील रोखू शकले नाहीत; पण त्यांच्या अस्तित्वामुळे निवडणुकीत जान होती. भाजपलाही तीन-चार मंत्री असून जिल्ह्यात दुष्काळ असल्याचा आरोप करायला मोठे टार्गेट मिळाले होते. यावेळी भाजपपुढे असे मुद्देच नाहीत! कारण सत्ता असल्याने येथे काय केले आणि पुढे काय करणार, यावरच बोलावे लागणार आहे !

यावेळी निवडणूक विकासाच्या मुद्द्यांपेक्षा वैयक्‍तिक आरोपांवर घसरली आहे. विशेष करून चांगल्या  भाषणांची आणि रोखठोकपणाची कमतरता जाणवते आहे. गेल्यावेळी पतंगराव आणि आर. आर. आबांसारखे वक्‍तृत्व असलेले नेते आणि गेम चेंजर म्हणून खासीयत असलेले मदन पाटील यांच्यासारखे नेतेही यावेळी आघाडीसाठी नाहीत. प्रतीक पाटलांना पुन्हा काँग्रेसचे तिकीट मिळवून देण्यासाठी त्यांच्या मागे ताकद लावण्यात त्यांनी एकेकाळ आपली स्टाईल वापरली होती. गेल्या लोकसभेला हे सर्व नेते होते, ते यावेळी नाहीत. याची कमतरता काँग्रेसला तर इतकी जाणवते आहेच; पण लोकांसाठी ही पोकळी अधोरेखीत होते आहे. मतदानासाठी अवघे आठ दिवस राहिले आहेत. सर्वच उमेदवार ग्रामीण भागात पायपीट करत आहेत; पण सांगली-मिरजेसारख्या मोठ्या शहरात अजून निवडणुकीचा कोणताच माहोलसुद्धा दिसत नाही. 

उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे कार्यकर्तेही वैतागले असतील; पण यावेळी प्रचार तसा थंडावल्यासारखाच चालला आहे. तासगावमध्ये झालेली शरद पवार यांची आणि इस्लामपुरात झालेली उद्धव ठाकरे यांची सभा सोडली तर मोठ्या सभा नाहीत की अजून कोणताही असा मुद्दा आलेला नाही की ज्यावरून निवडणूक फिरेल, टर्निंग पॉईंट मिळेल किंवा काही झाले नाही तरी किमान चर्चा व्हावी, असा एकही मुद्दा अजून विरोधकांकडून रिंगणात आलेला नाही. असेच एकंदर सांगली व हातकणंगले मतदारसंघातील वातावरण आहे.

उद्या कदाचित अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा काही वेगळा मुद्दा येथे छेडतात  का याची उत्सुकता आहे. कदाचित त्यानंतर महाआघाडीकडून धनंजय मुंडे, वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्या सभांनी रंग सत्ताधारी भाजपपुढे अडचणी वाढतील, का याचे अंदाज वर्तविले जात  आहेत. पण सर्वांत कमतरता जाणवते ती पतंगरावांची, यावेळी पतंगराव असते तर ही जागा काँग्रेसकडून गेली नसती, हा पहिला मुद्दा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसचे उमेदवारही कदाचित तेच असते. त्यामुळे कदाचित सध्या जे उमेदवार मैदानात आहेत तेदेखील वेगळे दिसले असते.

अर्थात पतंगराव नसल्याने कोणतेही वादळ  निर्माण करणारे मुद्देही दिसत नाहीत. पतंगरावांच्या वक्‍तव्याने विरोधक कधी घायाळ व्हायचे तर स्वत: काँग्रेसदेखील कधी कधी अडचणीत सापडायची.  एकंदरीत निवडणुकीत पतंगरावांसारखे हजरजबाबी आणि बेरकी वक्‍ते नाहीत याची काँग्रेसला मोठी कमतरता  भासते आहे. आतापर्यंत काँग्रेसकडून एकही राज्यातील मोठ्या नेत्याची सभा विशाल पाटलांसाठी झालेली नाही. पहिल्यांदाच दादा घराण्यातील उमेदवाराच्या प्रचारासाठी शरद पवार आले आणि त्यांनी विशाल यांच्यासाठी बॅटिंग केली.

आर. आर. पाटील यांची धडाडती तोफ नाही ही देखील दोन्ही काँग्रेससाठी मोठी कमतरता आहे. आर. आर. देशपातळीपासून गावपातळीपर्यंतचे मुद्दे  निवडणुकीत आणत असत. सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीकडे अगदीच मोजके स्टार प्रचारक आहेत. त्यापैकी धनंजय मुंडेसारखे वक्‍ते मराठवाड्यात अडकलेत. अशोक चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असले तरी ते स्वत:च्याच मतदारसंघात गुंतलेत. जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना कोल्हापूर आणि हातकणंगलेत गुंतवण्यात आलेलं आहे. राजू शेट्टींना यावेळी खासदार करण्याची ऐतिहासिक जबाबदारी त्यांच्यावर आहे. राष्ट्रवादीकडे यावेळी वक्‍त्यांची कमतरता भासत आहे. 

गेल्यावेळी सिंचनाचा मुद्दा पहिल्या स्थानावर होता. उद्योग आणि विकासापासून सांगलीची मोठी पीछेहाट झाली हा देखील मुद्दा प्रचारात मोदींपासून सर्व नेत्यांनी तापवला होता. गेल्या निवडणुकीत मोदी गुजरातचे मुख्यमंत्री  होते. त्यांनी तेथे सिंचनाच्याबाबतीत मोठ्या बंद पाईपमधून पाणी देऊन शेती आणि उद्योगांचा जो विकास केला त्याचे अप्रूप जनतेलाही वाटले होते. रखडलेल्या सिंचन योजनां पाहून जनता वैतागली होती. मोदींनी त्यावरच हल्ला चढवला होता. आम्हाला सत्ता द्या सांगलीचे नंदनवन करतो, असे ते म्हणाले होते.

हा मुद्दा लोकांना अपील झाला होता. कारण पंधरा वर्षे काँग्रेस आघाडीचे चार-चार मंत्री असून दुष्काळाने सहा तालुके हैराण होते. मोदींच्या या सभेला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली. यावेळी मोंदीची सभा होईल न होईल पण  त्यांनी जे स्वप्न दाखवले होते ते कितपत सत्यात येण्यासाठी  पाच वर्षांत भाजप नेत्यांनी प्रयत्न केले, हे आता जनतेसमोर मांडावे लागेल. ही नैतिकता भाजपने दाखवायला हवी. 

यावेळी संजय पाटील, विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर या सर्व तरुण तडफदार उमेदवारांतच जंग आहे. यापैकी कोणाला दिल्लीला पाठवायचे त्याचा फैसला १८ लाख मतदार करणार आहेत, तर वाळवा-शिराळ्यातील मतदार शेट्टी की धैर्यशील माने यांच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात आपला पासंग कोणाच्या बाजूला लावणार हे स्पष्ट होणार आहे.

सिंचन, महामार्ग अन्‌ चर्चा
टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना या अर्थातच मतदार संघातील सर्वाधिक क्षेत्राला व्यापणाऱ्या योजना आहेत. गेल्या पाच वर्षांत या योजनांसाठी दोन ठोस गोष्टी झाल्या. टेंभूचा ४०४८ कोटींचा सुधारित प्रस्ताव मंजूर झाला, तर म्हैसाळचा ४८४८ कोटींचा सुधारित प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून हा विकास आहेच! तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जाणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. या कामांचे श्रेय खासदार संजय पाटील घेतात, असा आरोप होत असला तरी ते भाजपच्या सत्ताकाळातील हे काम असल्याने यावर भाजपचा दावा असणार हे गृहीत आहे. रेल्वेचे विद्युतीकरण,  दुपदरीकरण ही कामे सुरू आहेत. मात्र उद्योग आणि शेतीच्या पातळीवर भरीव विकास अजून बाकी आहे. अर्धा पेला रिकामा आहे, तो शोधण्यात विरोधक कमी पडताहेत, हे मात्र नक्की. त्यामुळेच चर्चा विकासापेक्षा व्यक्तिगत पातळीवर घसरताना दिसतेय ती मुद्द्यांवर यावी ही अपेक्षा...


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com