Loksabha 2019 : ‘ते’ विष पेरताहेत, मी विकासाचं बोलतोय - संजय पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

गेल्या पाच वर्षांत सिंचन, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग,  ड्रायपोर्ट या विकासाच्या मुद्द्यांवर मी काम करत राहिलो. त्यात मोठे यश आले. मी त्या जोरावर लोकांसमोर जातोय, लोकांचे प्रेम हीच माझी ताकद आहे.  विरोधकांनी मात्र प्रचाराची पातळी सोडली आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच मतासाठी जातीचे विष पेरण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारच्या राजकारणाने जिल्ह्याची समाज व्यवस्था अडचणीत येईल. ते मला डिवचत आहेत, मात्र मी विकासावरच बोलणार आहे, अशी भूमिका भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार, खासदार संजय पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 

गेल्या पाच वर्षांत मी एकूण सुमारे ३० हजार कोटींचा निधी मतदार संघात आणला. त्यात केंद्र, राज्य  सरकारच्या निधीचा समावेश आहे. टेंभू, ताकारी योजनेचे कासव गतीने सुरू असलेले काम झपाट्याने पुढे नेले. अनुशेषाचा तिढा सोडवून पंतप्रधान कृषी सिंचन  योजनेतून मंजुरी आणली. दोन्ही योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली. नव्याने दीड लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. ऊस, द्राक्ष, केळी, डाळिंब,  भाजीपाला अशी पिके खूप गतीने वाढली.

शेतीतून रोजगार निर्माण झाला. बेरोजगार, अल्पभूधारक, भूमिहीनांसाठी ही रोजगाराची संधी ठरली. शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांच्या हाती पैसे खेळू लागले. दुधाचे उत्पादन दीडपटीने वाढले. कोयना-वारणेतून सिंचनासाठी ३.५ टीएमसी पाणी उचलले जात होते,  आता वर्षाला ७ टीएमसी पाणी उचलले जाते. घाटमाथ्यावर पाणी नेले. पाणीपट्टीचा ८१-१९ चा फॉर्म्युला मंजूर करून घेतला. मी नुसता नारळ फोडले, असा आरोप करणाऱ्यांनी हे साडेतीन टीएमसी पाणी नारळातून पडले का, याचे उत्तर द्यावे. 

राष्ट्रीय महामार्गांसाठी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे किती पाठपुरावा केला, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. रत्नागिरी-नागपूर, पेठ-सांगली महामार्गाचे  काम कुणी केले, याचे उत्तर द्यावे. रेल्वेच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाशिवाय उद्योग विकासाला चालना देता आली नसती. आधी ते काम मंजूर करून घेतले. ४१०० कोटींचे काम आहे. रांजणी येथील ड्राय पोर्टचा विषय बऱ्यापैकी मार्गी लागला आहे. तो अधिक विस्तारित करण्याचा विचार सुरू आहे. 

केवळ उद्योग आले  पाहिजेत, असे म्हणून चालत नाही. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करून द्याव्या लागतात. पाच वर्षांत तो पाया मी घातला आहे. जे सांगितले होते, ते करून जिल्ह्याच्या विकासाला गती दिली आहे. आता कौशल्य विकासावर आधारित रोजगार निर्मितीचा प्रयत्न आम्ही ताकदीने हाती घेतला आहे. इथली महाविद्यालये आणि राज्य शासन यांच्यात संवाद घडवून आणतोय. याआधी ‘त्यांच्या’ घरात ११ वेळा खासदारकी होते, कुठला मार्ग आणला? कुणाच्या सुख-दुःखात सामील झाले. काय विकास केला, हे त्यांनी सांगावे. 

‘यशवंत’ मी घेतला
नागेवाडी येथील यशवंत कारखाना मी अडचणीत आणला नाही. तेथील मी सभासद, संचालक काहीच नव्हतो. तो कारखाना जिल्हा बॅंकेने सिक्‍युरिटायझेशनखाली  विकायला काढला, मी निविदा भरली आणि तो विकत घेतला. तासगाव कारखान्यात आर. आर. आणि पतंगरावांची सत्ता होती. ती त्यांच्या काळात बंद पडली. त्यात माझा काय संबंध? दिशाभूल करून लोकांत गैरसमज पसरवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याकडे विकासाचे बोलायला काही नाही, त्यामुळे असले विषय काढताहेत. 

मतभेद... मनभेद नव्हे

भाजपमधील काही नेत्यांसोबत किरकोळ गैरसमज होते. ते मतभेद होते, मनभेद नाही. एका बैठकीत सारे विषय संपले. सारे एका दमाने कामाला लागले आहेत. सांगलीत माजी आमदार संभाजी पवार यांच्याशीही संबंध चांगले झाले आहेत. त्यांनी दीर्घकाळ येथे राजकारण केले. त्याचा नक्की मला फायदा होईल. आमदार अनिल बाबर युती झाल्याने आमच्यासोबत ताकदीने उभे राहिले  आहेत. त्यामुळे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी वेगळा निर्णय घेतला असेल, मी त्यावर काही बोलणार नाही. 

विकासाची लाट
२०१४ मध्ये देशात नरेंद्र मोदी यांची लाट होती. ती आता विकासाची लाट आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी देशात इतकी कामे केली आहेत, की लोक समाधानी आहेत. देशाला कणखर पंतप्रधान हवा, हे लोकांचे ठाम मत आहे. कणखर राष्ट्रवाद, देशभक्ती त्यांनी दाखवली आहे. 

विशाल पाटलांचा केविलवाणा प्रयत्न
स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी शेवटचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यांनी दहा-पंधरा दिवस काँग्रेसला उमेदवारी नको-नको म्हणून सांगितले. जागा जातेय म्हटल्यावर वसंतदादा घराणे संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गळा काढून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. ते सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न करत आहेत. ते होणार नाही, हा त्यांचा शेवटचा प्रयत्न असेल. 

आर. आर. पॅटर्न
आर. आर. पाटलांनी आयुष्यभर मला गुंड म्हणून प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. मी काय गुंडगिरी केलीय? कुणाचे पैसे खाल्लेत? मी नेभळट नाही, मला  नेभळटपणा मान्य नाही. काही मर्यादेपर्यंत मी शांत असतो, त्यानंतर कुणी अंगावर येत असेल तर गप्प कसे बसणार?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Sanjay Patil comment in Coffee with Sakal