esakal | ऊसतोडणीसाठी लुट; एकरी 8 हजारांची मागणी

बोलून बातमी शोधा

Loot for cane cutting; Demand for 8 thousand per acre}

ऊस वाहतुकीच्या वाहन चालकांना प्रत्येक खेपेस द्यावयाच्या एंट्रीची रक्कम प्रत्येक गळीत हंगामागणित वाढत चालली आहे.

paschim-maharashtra
ऊसतोडणीसाठी लुट; एकरी 8 हजारांची मागणी
sakal_logo
By
गजानन पाटील

पेड : ऊस वाहतुकीच्या वाहन चालकांना प्रत्येक खेपेस द्यावयाच्या एंट्रीची रक्कम प्रत्येक गळीत हंगामागणित वाढत चालली आहे. याबाबत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असताना साखर कारखान्यांनी बाळगलेले मौन आणि शेतकऱ्यांचा कळवळा असणारी शेतकरी संघटना यावर गप्प असल्याने शेतकऱ्यांच्या प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे. या आर्थिक पिळवणुकीकडे साखर आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे. 

तासगाव, खानापूर, वाळवा तालुक्‍यात सध्या गळीत हंगाम हा अंतिम टप्प्यात आला आहे. ऊस तोडणीच्या कारणावरून शेतकरी व ऊसतोड मजूर यांच्यात सतत वादाचे प्रसंग घडत आहेत. एक एकर ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऊसतोड मजूर 8 ते 9 हजार रुपयांची मागणी करू लागले आहेत. तर हा ऊस घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांच्याकडून प्रत्येक गाडीमागे 400 ते 500 रुपयांची "एन्ट्री' घेतली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. याकडे मात्र संबंधित कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. 

वास्तविक साखर कारखान्यांकडून या मजुरांना नियमाप्रमाणे ऊस तोडणी मजुरी व वाहतूक खर्च दिला जातो. याबाबत कारखान्यांकडून आवश्‍यक मोबदला मिळत असूनही ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी केली जात आहे. वाहनचालकांना शेतकऱ्यांच्याकडून दोन वेळेचे जेवण देऊन सुद्धा शेतकऱ्यांच्याकडून हेच वाहनचालक सक्तीने एन्ट्री वसूल करतात. 

जेवणाची सोय वाहन मालकाचीच 
वास्तविक पाहता वाहन चालकाच्या जेवणाचा आणि शेतकऱ्यांचा उसाचा काडीमात्र संबंध नसताना ही शेतकरी केवळ वाहनचालकांची जेवणाची वेळेत सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाने जेवण देत आहे. याच वाहनचालकांना संबंधित ट्रॅक्‍टर किंवा ट्रक मालक हे पगार देत असतात. त्यांच्या जेवणाची जबाबदारी ही वाहन मालकाचीच आहे. केवळ शेतकरी आपला ऊस वेळेत जावा यासाठी मर्जी खातर जेवण देत आहे. 

अशी आहे पैशांची मागणी
- मजुरांकडून एकरी 8 ते 9 हजारांची मागणी 
- वाहन चालकांकडून 500 रुपये एंट्री 
- लुटीकडे कारखान्यांनी लक्ष द्यावे 
- जिल्ह्यातील शेतकरी संघटना बेपत्ता 
- मजुरांचा साखर सम्राटांना आशीर्वाद 
- वाढत्या महागाईने शेती व्यवसाय तोट्यात

संपादन : प्रफुल्ल सुतार