मेढा - केळघरला झाडांची कत्तल ; महाबळेश्वर- विटा महामार्गाच्या कामाला वेग 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

महाबळेश्वर-विटा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सुरू असलेली झाडांची कत्तल. 

केळघर ः महाबळेश्वर-विटा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र, चौपदरीकरणात मेढा-केळघर दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे मुळासकट उखडून टाकली जात असल्यामुळे वृक्षप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. ज्या गतीने झाडे तोडली जात आहेत, त्याच गतीने ही झाडे परत लावली जातील का, असा प्रश्नही उपस्थित होवू लागला आहे. 

महाबळेश्वर-मेढा-सातारा-रहिमतपूर-विटा या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम सुरू असले तरी यंदा तालुक्‍यात उच्चांकी पाऊस झाल्यामुळे मेढा-केळघर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. वास्तविक चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. मेढा-केळघर रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळाची मोठमोठी झाडे ही सुमारे 50 ते 60 वर्षांपासून आहेत. धो-धो पाऊस, कडक उन्हातही या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या झाडांनी आधार दिला आहे. चौपदरीकरणाचे कामही गरजेचे आहे. यात दुमत नाही. मात्र, 50 ते 60 वर्षांपासून दिमाखात उभी असलेली झाडे काही मिनिटांतच जमीनदोस्त होत असल्याने पर्यावरणप्रेमींमधून चिंता व्यक्त होत आहे.

रस्त्याच्या कामासाठी जरी ही झाडे तोडणे गरजेचे असले तरी तोडलेल्या झाडांच्या बदली नवीन झाडे लावली जाणार काय, असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्यामुळे पर्यावरणाचा समतोलही बिघडण्याची शक्‍यता वर्तवली जात आहेत. वृक्षतोडीचा फटका पर्जन्यमानावर बसण्याची भीतीही व्यक्त होत आहे. 

विटा-महाबळेश्वर या महामार्गासाठी जरी झाडे तोडली जात असली तरी जेवढी झाडे तोडली जाणार आहेत, त्याच्या पाचपट झाडे काम घेतलेल्या ठेकेदाराकडून लावून घेण्याचा करार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष ठेवून आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण केले जाईल. 

- कृष्णात निकम, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जावळी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lot of trees cutted on Medha Kelghar road; Mahabaleshwar - vita Speeding up highway work