सांगली-इस्लामपुर राज्य महामार्गावर कमरेइतके पाणी

शांताराम पाटील
Friday, 16 October 2020

सांगली-इस्लामपूर राज्य महामार्गावर इस्लामपूर शहराच्या पुर्वेला आज दिवसभर कमरेइतके पाणी होते. त्यामुळे या मार्गावरील बरीचशी वाहतूक वाळवा मार्गे सुरु होती.

वाळवा : सांगली-इस्लामपूर राज्य महामार्गावर इस्लामपूर शहराच्या पुर्वेला आज दिवसभर कमरेइतके पाणी होते. त्यामुळे या मार्गावरील बरीचशी वाहतूक वाळवा मार्गे सुरु होती. महामार्गालगतच्या काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक नाला बुजवल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. विशेष बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. 

मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कऱ्हाड, इस्लामपूर परिसरातून सांगली-इस्लामपूर राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने धावतात. शिवाय हा महामार्ग जिल्हांतर्गत वाहतूकीसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. गेल्या 24 तासात झालेल्या सलग पावसाने या महामार्गालगतचा हा ओढा पुर्णपणे तुंबला होता. त्या पाण्याची फुग पश्‍चिमेकडे जवळपास अर्धा किलोमीटर इतकी होती. त्यामुळे त्या परिसरातील अनेक जनावरांचे गोठे व काही शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले. 

एका गोठ्यात तर सुमारे तीन फुट इतके पाणी उभे होते. या गोठ्यातील गाई शेतकऱ्यांनी महामार्गावर स्थलांतरीत केल्या होत्या. सांगली-इस्लामपूर राज्य महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे इस्लामपूर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाने संपूर्ण वाहतूक वाळवा मार्गे वळवली. त्यामुळे वाळवा-इस्लामपूर मार्गावर दिवसभर वाहनांची गर्दी होती. शिवाय वाळवा ते पडवळवाडी रस्त्यातील ओढ्याला पुर आल्यामुळे या ठिकाणीही काही काळ सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली होती. सांगली-इस्लामपूर महामार्गावर दुपारनंतर अनेक मोठ्या वाहनचालकांनी धोका पत्करुन वाहने पाण्यातूनच इस्लामपूरकडे नेली.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lots of water on the Sangli-Islampur state highway