चॉकलेटचे आमिष पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; वाचा कुठे घडली घटना

बाजीराव घोडे
Saturday, 12 September 2020

ल्लीत खेळत असताना घरात कोणी नसल्याचे पाहून, "चॉकलेट खाऊ देतो', असे आमिष दाखवून पाच वर्षांच्या मुलीवर आकाश सुभाष पवार (वय 19, सध्या रा. माळेवाडी, ता. शिराळा) याने दोन वेळा अत्याचार केले

कोकरुड (जि. सांगली) : गल्लीत खेळत असताना घरात कोणी नसल्याचे पाहून, "चॉकलेट खाऊ देतो', असे आमिष दाखवून पाच वर्षांच्या मुलीवर आकाश सुभाष पवार (वय 19, सध्या रा. माळेवाडी, ता. शिराळा) याने दोन वेळा अत्याचार केले; अशी तक्रार पीडीत मुलीच्या आईने कोकरूड पोलिसांत दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्ह्याची नोंद करून आकाशला ताब्यात घेतले. 

याबाबत कोकरूड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजता मुलगी रडत घरी आली. आईने काय झाले विचारले असता, पोटात दुखत असल्याचे मुलीने सांगितले. लहान मुलगी आहे कशाने तरी पोटात दुखत असेल, असे समजून मुलीच्या आईने कोरोना साथीमुळे मुलीला दवाखान्यात न नेता फॅमिली डॉक्‍टरांना पोटात दुखत असल्याची माहिती फोनवरून देऊन औषध विचारून घेतले. ते औषध देऊनही तिच्या पोटात दुखत होते.

त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता मुलगी गल्लीत खेळत होती. आईने स्वयंपाक झाल्यानंतर मुलगी घरी न आल्याने ती कुठे आहे याचा शोध घेतला असता, गावातील अंजना बाळू मोहिते यांच्या घरी असल्याचे समजले. मुलीची आई त्यांच्या घरी गेली. त्यावेळी अंजना मोहितेच्या मुलीचा मुलगा आकाश हा मुलीशी अश्‍लील चाळे करत असल्याचे मुलीच्या आईने पाहिले. मुलीच्या आईस बघताच आकाश पवार तिथून पळून गेला. मुलीला घरी आल्यावर पाठीमागे हा असाच प्रकार घडल्याचे मुलीने आईस सांगितले. तेव्हा खरा प्रकार काय आहे याची विचारणा मुलीच्या वडिलांनी आकाशला 11 रोजी केली. त्यावेळी त्याने गौरी गणपतीच्या सणापूर्वी दोन दिवस अगोदर आमच्या घरात मुलगी खेळत असता, घरात कोणी नाही असे पाहून मी तिच्यावर अत्याचार केल्याची कबुली दिली.

आकाश हा सहा महिन्यापासून आजोळी आला आहे. याबाबत सायंकाळी 5.30 वाजता मुलीच्या आईने कोकरूड पोलिसांत तक्रार दाखल केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दतात्रय कदम करत आहेत. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The lure of chocolate tortures a five-year-old girl