
सांगली कॉंग्रेस भवनच्या इमारतीवर मदनभाऊ प्रेमींनी श्रीमती जयश्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त "अब की बारी...हमारी बारी...!' असा फलक काही दिवसांपूर्वी लावला आहे.
सांगली : कॉंग्रेस भवनच्या इमारतीवर मदनभाऊ प्रेमींनी श्रीमती जयश्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त "अब की बारी...हमारी बारी...!' असा फलक काही दिवसांपूर्वी लावला आहे. फलकावरील मजकुरातून सांगलीतील उमेदवारीवर मदनभाऊंच्या गटाने सांगली विधानसभेच्या उमेदवारीवर एकप्रकारे दावाच केल्याचे स्पष्ट होते. कार्यकर्त्यांतही या फलकावरून चर्चा रंगली आहे. वाढदिवस होऊनही हा फलक कायम असल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे.
मदनभाऊंच्या पश्चात सांगलीच्या उमेदवारीवर श्रीमती जयश्री पाटील यांनी दावा केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी मेळावा घेऊन चाचपणी केली होती. त्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीची मागणी केली.
प्रत्यक्षात कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांनीही अनपेक्षितपणे मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली. शेवटच्या टप्प्यात प्रचाराचे रान उठवले. त्याचा परिणाम म्हणून जोरदार टक्कर देत निसटता पराभव स्विकारला. कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी हा निकाल धक्कादायक ठरला.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. तशातच सांगलीत कॉंग्रेसची ताकद पुन्हा वाढल्यामुळे उमेदवारीवर दावा करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. जयश्री पाटील यांना उमेदवारी डावलली गेल्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. अखेर पक्षश्रेष्ठींनी त्यांना विनंती करत पक्षात थांबवून ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात शुभेच्छांचे फलक लावले गेले. त्यापैकी एक फलक कॉंग्रेस भवनच्या प्रवेशद्वाराशेजारीच लावण्यात आला आहे.
त्यावर कार्यकर्त्यांनी जयश्रीताईंनी शुभेच्छा देताना "अब की बारी...हमारी बारी' असा मजकूर प्रसिद्ध केला आहे. त्यामागे विधानभवनाचे चित्र आहे. त्यामुळे मदनभाऊंच्या गटाने सांगलीच्या उमेदवारीवर आतापासूनच दावा दाखल केल्याचे स्पष्ट होते. निवडणुकीसाठी अद्याप बराच अवधी आहे. परंतू आतापासून मदनभाऊंचा गट सक्रीय झाल्याचे दिसून येते.
संपादन : युवराज यादव