माधवनगर, बलवडी आता एका क्‍लीकवर; ई-ग्राम ऍपने जोडली गावे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

इंटरनेटच्या माध्यमातून जग तळहातावर आले असताना गावचा कारभारही अधिक गतीमान होणार आहे.

सांगली : इंटरनेटच्या माध्यमातून जग तळहातावर आले असताना गावचा कारभारही अधिक गतीमान होणार आहे. एका क्‍लिकवर जगाचे ज्ञान आणि गाव विकासाला गती देण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. त्यात माधवनगर (ता. मिरज) आणि बलवडी भा. (ता. खानापूर ) ग्रामपंचायतींनी पहिले पाऊल टाकले असून या दोन्ही ग्रामपंचायती "ई-ग्राम' होणार आहेत. त्यासाठी दोन्ही ग्रामपंचायतीनी सकाळ व ऍग्रोवनच्या "ऍग्रोटेक इंडस्ट्रीज'शी करार केला आहे. गाव घडामोडी, विकासकामे, जगभरातील ताज्या घडामोडींची माहिती, शेतकऱ्यांना शेतीविषयक सखोल ज्ञान, बाजारभाव यांची माहिती घरबसल्या एक क्‍लिकवर मिळणार आहे. 

माधवनगरचे सरपंच अनिल पाटील आणि बलवडी भा.चे सरपंच प्रविण पवार यांनी याबाबतचे करारपत्र ऍग्रोवन ऍग्रोटेकचे प्रतिनिधी अजिंक्‍य येळणे आणि प्रीतम बुधावले यांच्याकडे सुर्पुद केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी ही संकल्पना अतिशय प्रभावी असल्याचे कौतुक करत ग्रामपंचायतींनी गतीमान कारभारासाठी या ऍपचा निश्‍चित वापर करावा, अशी भूमिका घेतली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तानाजी लोखंडे यांनी या प्रक्रियेमुळे गावचा संपूर्ण कारभार डिजीटल होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. 

ई-ग्राम ऍपमुळे ग्रामपंचायतीने केलेली विकासकामे जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवता येणार आहेत. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचे छायाचित्र, माहिती त्यात समाविष्ट होणार आहे. ग्रामपंचायत कर या ई-ग्रामद्वारे भरता येतील. त्याव्दारे दंवडी देता येईल. गावाची पायाभूत माहिती, वैशिष्ट्ये, विकास आराखडा त्यावर मांडता येईल. या ऍपद्वारे इतरांची जाहिराती करता येऊ शकेल. त्यातून ग्रामपंचायतीला स्वतःचा उत्पन्नाचा नवा मार्ग उपलब्ध होईल. आपल्या कारभाराचा "विकासनामा' या ऍपव्दारे संबंध लोकांसमोर ठेवता येईल. ग्रामपंचायतीचे कायदे, नियम, गावचे धोरण, नव्या संकल्पना, लोकांकडून मागवायच्या सूचना हे सारे व्यवहार एक क्‍लिकवर करता येतील. 

बलवडी (भा.)च्या ग्रामसेविका पल्लवी नाईक म्हणाल्या, ""स्पर्धेच्या काळात प्रशासन ही बदलत चालले आहे. ई-ग्राम ऍपद्वारे शासकीय निर्णय लवकर समजतील. लोकांच्या तक्रारीचे निराकरण होईल. गावातून बाहेर असणाऱ्या लोकांना गावची इंत्थभूत माहिती मिळेल. गावाविषयी आस्था निर्माण होईल.'' 

बलवडी भा. येथे उपसरपंच प्रसाद पवार, सुमन पवार, प्रा.संतोष जाधव, नीलम सुर्यवंशी, जैतुन्बी मुलाणी, शोभा पवार, नीलम पवार, शशिकांत जाधव, बाबूराव दुपटे, अजित पवार, ग्रामसेविका पल्लवी नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ऍपविषयी अधिक माहितीसाठी अजिंक्‍य येळणे (98341-64740), प्रीतम बुधावले (98569-75188) यांच्याशी संपर्क साधावा. 

बहुतांश ग्रामपंचायती एका क्‍लिकवर येणार
ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजात सुसूत्रता आणणे, नागरिकांना जलद सुविधा देण्यासाठी ई-ग्राम ऍप्लिकेशन उपयुक्त आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायती त्याचा प्रभावी वापर करत आहेत. सांगली जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना ते घेण्याची सूचना दिली असून आता बहुतांश ग्रामपंचायती एका क्‍लिकवर येणार आहेत.

- निलेश शेजवळ, सीईओ, ऍग्रोवन-ऍग्रोटेक इंडस्ट्रीज्‌ प्रा.लि. 

ई-ग्राम हे ऍप उपयुक्त

बदलत्या काळानुसार लोकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मिळाली पाहिजे. ग्रामपंचायतीने केलेली विकासकामे लोकांपर्यंत सहज पोहचली पाहिजे. यासाठी ई-ग्राम हे ऍप उपयुक्त ठरेल.
- प्रविण पवार, सरपंच बलवडी भा. 

नक्कीच मोठा लाभ होईल

माधवनगर ही मोठी ग्रामपंचायत असून ती विकासात गतीमान आहे. आमचा कारभार, विकासकामे, नव्या कल्पना, कर आकारणी, सूचना, अन्य व्यवहार सहज, सुलभ करण्यासाठी आम्ही ई-ग्राम होण्याचे ठरवले. नक्कीच आम्हाला त्याचा मोठा लाभ होईल.

- अनिल पाटील, सरपंच, माधवनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhavnagar, Balwadi now on a click; Villages connected by e-Gram app