महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला भौगोलिक राजमान्यता 

रविकांत बेलोशे
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

भिलार : भिलार, मेटगुताड किंबहुना संपूर्ण महाबळेश्‍वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीने कोट्यवधी लोकांच्या जिभेवर अधिराज्य गाजवले आहे. महाबळेश्वर - पांचगणी पर्यटनाला आल्यावर बाजारपेठेत तजेलदारपणे टोकरित दाखल झालेली अथवा निसर्ग पर्यटनात हिरव्यागार पानातून डोकावणारी लालचुटूक स्ट्रॉबेरीची फळे पर्यटकाना आकर्षित करतात. पर्यटन काळात जिभेवर स्ट्रॉबेरीची आंबट गोड चव न चाखनारा पर्यटक विरळच. काल केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीला भौगोलिक मानांकनाची अधिकृत घोषणा केली आहे.

भिलार : भिलार, मेटगुताड किंबहुना संपूर्ण महाबळेश्‍वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीने कोट्यवधी लोकांच्या जिभेवर अधिराज्य गाजवले आहे. महाबळेश्वर - पांचगणी पर्यटनाला आल्यावर बाजारपेठेत तजेलदारपणे टोकरित दाखल झालेली अथवा निसर्ग पर्यटनात हिरव्यागार पानातून डोकावणारी लालचुटूक स्ट्रॉबेरीची फळे पर्यटकाना आकर्षित करतात. पर्यटन काळात जिभेवर स्ट्रॉबेरीची आंबट गोड चव न चाखनारा पर्यटक विरळच. काल केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीला भौगोलिक मानांकनाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आता चांगला भाव तसेच उत्पादनाला परदेशातुन मागणी वाढेल असा विश्वास येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

महाबळेश्वर या पर्यंटनस्थळाला वेगळी ओळख आहे. सर माल्कम या ब्रिटीश गव्हर्नरने महाबळेश्‍वर हे थंड हवेचे ठिकाण शोधून काढले.  माल्कम पेठ म्हणून या शहराला ओळखले जात होते. मुंबई प्रांतात येणारे महाबळेश्‍वर हे पूर्वी ब्रिटीशांची उन्हाळी राजधानी असायची.  युरोप आणि महाबळेश्वरचे वातावरण मिळतेजुळते असल्याने ब्रिटीशांनी युरोपातील स्ट्रॉबेरी फळाचे रोपटे थंड वातावरण असणाऱ्या महाबळेश्वरच्या डोंगरमाथ्यावर लावले. स्वीट चार्ली,  कामारोझा,  अशा अनेक जातीची स्ट्रॉबेरीची रोपे लागवड केली. देशात पिकणार्‍या एकूण स्ट्रॉबेरीपैकी 85 टक्के स्ट्रॉबेरीचे पीक हे महाबळेश्‍वर - पाचगणी परिसरात घेतले जाते. महाबळेश्‍वरची स्ट्रॉबेरी आपल्या विशिष्ट चवीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. महाबळेश्‍वर आणि स्ट्रॉबेरी या समीकरणाचा वेगळा 'पर्यटन पॅटर्न ' निर्माण झाला आहे. त्यामुळे महाबळेश्वरच्या लाल चुटुक स्ट्रॉबेरीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. 

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला यापूर्वीच राजमान्यता प्राप्त झाली आहे . केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने बौद्धिक संपदा कायद्यांतर्गत भौगोलिक मानांकन ते आता जाहीर केले आहे त्यामुळे महाबळेश्‍वरच्या सुप्रसिद्ध स्ट्रॉबेरीला आता राजमान्यता मिळाल्याने शेतकरी आनंदले आहेत. महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला राजमान्यता प्राप्त झाल्याने अलीकडच्या काळात वाढत्या उत्पादन, अनियमित वातावरण यामुळे शेतकरी चिंतीत झाला होता परंतु आता येथील स्ट्रॉबेरीला मानांकनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची द्वारे खुली झाली आहेत, त्यामुळे दर चांगला मिळून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होणार आहे. 

(स्ट्रॉबेरीची वैशिष्ट्ये)  महाबळेश्वरामधील स्ट्रॉबेरीमध्ये पाण्याचे प्रमाण 80 टक्के असल्यामुळे इतर जातींपेक्षा ही जात जास्त रसदार आहे. इतर जातींमध्ये बियांची संख्या दीडशेच्या जवळपास असते, तर महाबळेश्वरच्या स्टॉबेरीमध्ये जवळपास 200 बिया असतात. महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीमध्ये ग्लुकोजचे प्रमाण 10 टक्के आढळते व ती इतर जातींपेक्षा अधिक गोड आहे. या स्ट्रॉबेरीमध्ये 0.25 - 0.7% प्रोटिन्स, 8.5 - 9.2% कार्बोहायड्रेट्स व 0.1 % तंतू असतात. या स्ट्राबेरीमध्ये चरबीचे प्रमाण कमीतकमी, तर 'क' जीवनसत्त्व, तंतू, पोटॅशिअम व फॉलिक अ‍ॅसिड यांचे प्रमाण जास्त असते.

भौगोलिक परिस्थिती- महाबळेश्वरमधील तांबड्या जमिनीत लोहाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे पोषणमूल्य वाढते.

हवामान - महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीला लाल रंग येण्यामागचे कारण म्हणजे येथे मिळणारी आवश्यक उष्णता व उपलब्ध सूर्यप्रकाश हे आहे. आवश्यक उष्णता व सूर्यप्रकाश नसेल, तर स्ट्रॉबेरीला लालसर तपकिरी रंग प्राप्त होतो. 

येथील लाल माती आणि पाच नद्यांचे उगमस्थान यांमुळे स्ट्राबेरी उत्पादन घेण्यासाठी महाबळेश्वर हे एक परिपूर्ण वातावरण असलेले ठिकाण बनले आहे.

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला राजमान्यता मिळाल्याने शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे फळ म्हणावे लागेल. हि प्रक्रिया यापूर्वीच झालेली असून आता भौगोलिक मानांकन जाहीर केले आहे. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादकांना आणखी उत्साह निर्माण झाला आहे. तांबड्या मातीतली हि लालचुटुक स्ट्रॉबेरी आता परदेशी बाजारपेठेत आणखी नव्या उत्साहाने दाखल होईल असा विश्वास वाटतो.
- बाळासाहेब भिलारे, अध्यक्ष स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशन दिल्ली

महाबळेश्‍वरातील भिलार, मेतगुताड, भोसे, अवकाळी अशा ठिकानावरील शेतकर्‍यांनि स्ट्रॉबेरीसाठी घेतलेल्या श्रमाचा याद्वारे सन्मान झाल्याची भावना निर्माण होत असून महाबळेश्वरच्या स्ट्रारोबेरीला या आगोदरच काही वर्षांपूर्वी राजमान्यता मिळाली आहे आता या भौगोलीक मानांकनाच्या घोषणेने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहेच परंतु परदेशात निर्यात होणाऱ्या प्रक्रियेला पडलेला खंड थांबून पुन्हा परदेशवारी सुरु होईल अशी आशा निर्माण झाली आहे. 
- किसंनशेठ भिलारे, कृषीतज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahabaleshwar's climate nutrients for geographically strawberry