गृहमंत्री शहांच्या उपस्थितीत होणार महाजनादेश यात्रेचा समारोप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

तुळजापूर येथून आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास महाजनादेश यात्रेचे सोलापुरात आगमन होणार आहे.

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या महाजनादेश यात्रेचा दुसऱ्या टप्प्यातील समारोप आज (रविवार) सायंकाळी सोलापुरातील पार्क स्टेडिअमवर होणार आहे. समारोपासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापुरात येत असल्याने सोलापूर भाजपमय झाले आहे. 

तुळजापूर येथून आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास महाजनादेश यात्रेचे सोलापुरात आगमन होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या यात्रेचे आगमन होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांतील 50 विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 484 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा सोलापुरात येत आहे. 

प्रवेशाचे सस्पेन्स कायम 
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आज राज्यातील कोणकोणत्या नेत्यांना प्रवेश दिला जाईल, याबद्दल पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख हे स्पष्टपणे बोलताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस याबाबत निर्णय घेतील अशी भूमिका ते घेताना दिसत आहेत.

माणचे (जि. सातारा) काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे आज या दोन आमदारांचा प्रवेश निश्‍चित मानला जात आहे. या शिवाय आणखी कोण कोण प्रवेश करणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahajanesh Yatra ends in the presence of Home Minister Shah