महालक्ष्मी, कोयना, गोंदिया, अजमेर एक्‍स्प्रेस रुळावर; राज्यांतर्गत रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील

शंकर भोसले
Friday, 9 October 2020

राज्यांतर्गत रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र या गाड्या पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत प्रयोगिक तत्त्वावर धावणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मुंबईकरीता कोयना, महालक्ष्मी, गोंदियाकरीता महाराष्ट्र, तर दिल्ली करीता अजमेर एक्‍स्प्रेसचा समावेश आहे.

मिरज ः राज्यांतर्गत रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र या गाड्या पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत प्रयोगिक तत्त्वावर धावणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मुंबईकरीता कोयना, महालक्ष्मी, गोंदियाकरीता महाराष्ट्र, तर दिल्ली करीता अजमेर एक्‍स्प्रेसचा समावेश आहे.

कोरोना संसर्गानंतर सहा महिन्यांनी मिरज रेल्वे जंक्‍शन प्रवाशांनी गजबजणार आहे. कोयना एक्‍स्प्रेसमुळे सांगली-कोल्हापुरातील नोकरदार आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर महाराष्ट्र गोंदिया, महालक्ष्मी एक्‍स्प्रेस रेल्वे सोमवार आणि मंगळवारपासून पूर्व नियोजनानुसार धावतील. तर म्हैसूर, अजमेर गाडी दर बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी सुटेल. 

अनलॉकनंतर शासकीय आणि निमशासकीय कार्यालये सुरू झाली. सांगलीतून कोल्हापूर आणि कोल्हापुरातून सांगलीत नोकरी तसेच व्यवसायासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या गाड्यांमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. खासगी वाहनांचे भाडेदर गगनाला भिडल्यामुळे प्रवाशांना आर्थिक झळ बसत आहे. मात्र कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नोकरदारांना प्रवासी रेल्वे गाड्या सुरू झाल्यामुळे सोय होणार आहे. 

आरक्षण खिडकी सुरू 
दसरा, दिवाळीमुळे महालक्ष्मी, गोंदिया, कोयना, अजमेर गाड्या सुरू होत असल्यामुळे आरक्षण खिडकी सुरू झाली आहे. एरवी शुकशुकाट पसरलेल्या मिरज रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडकीवर गर्दी होऊ लागली आहे. सोशल डिस्टंन्स पाहता मिरज स्थानकातील आरक्षण खिडकीची कमतरता भासणार आहे. 

राणी चन्नम्मा मिरजेपर्यंतच 
एरवी कोल्हापूरपर्यंत धावणारी राणी चन्नम्मा एक्‍स्प्रेस बंगळूर ते मिरजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र या निर्णयास प्रवासी संघ आणि रेल्वे संघटनांचा विरोध आहे. 

नव्या गाड्यांची वेळ 

  • कोल्हापूर-कोयना- सकाळी 9ः15 
  • महाराष्ट्र एक्‍स्प्रेस- 4ः30 
  • महालक्ष्मी- रात्री 9ः30 
  • अजमेर- दुपारी 12 ः30 (बुधवार आणि शुक्रवार) 

संपादन : युवराज यादव 


    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: Mahalakshmi, Koyna, Gondia, Ajmer Express on the track; Green lanterns for inter-state trains