कधी एकदा संपतो हा प्रवास...

संतोष भिसे
रविवार, 28 जुलै 2019

मिरज - कधी एकदाचा संपतो हा प्रवास अशी हैराण प्रतिक्रिया महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांची होती. त्यांना घेऊन विशेष गाडी मिरज जंक्शनमध्ये आली. प्रशासनाने जेवण, पाणी, चहाचे वाटप केले, पण खायला नको, लवकर कोल्हापुरात पोहोचवा असा वैतागसूर प्रवाशांनी आळवला.

मिरज - कधी एकदाचा संपतो हा प्रवास अशी हैराण प्रतिक्रिया महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांची होती. त्यांना घेऊन विशेष गाडी मिरज जंक्शनमध्ये आली. प्रशासनाने जेवण, पाणी, चहाचे वाटप केले, पण खायला नको, लवकर कोल्हापुरात पोहोचवा असा वैतागसूर प्रवाशांनी आळवला.

बदलापूरजवळ अडकलेल्या महालक्ष्मीच्या प्रवाशांसाठी रात्री विशेष गाडी सुटली. कल्याण, मनमाड, कुर्डुवाडीवाडीमार्गे प्रवास झाला. मुंबई - कोल्हापूरचा 518 किलोमीटरचा प्रवास अकरा तासांचा, पण त्यासाठी छत्तीस तासांहून अधिक वेळ लागला. कधी एकदाचा संपतो प्रवास अशी भावना वसीम आणि हिना पटेल दांपत्याने दिली. ते मुंबईतून कोल्हापूरला नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी निघाले होते. सोबत दिड वर्षांचे बाळ होते. त्यांच्यासाठी हा प्रवास हैराण करणारा ठरला. पाण्यातून सुटकेनंतर मुबंईला परतण्याचे ठरवले, पण कार्यक्रमाला येणे आवश्यक होते. कल्याणमधून सुटलेली विशेष गाडी रात्री दहाला मनमाडला पोहोचली. तेथे रेल्वे प्रशासनाने जेवण, पाणी दिले. सकाळी कुर्डुवाडी येईपर्यंत मात्र पाणीदेखील मिळाले नाही. यादरम्यान, लहानग्या बाळाचे अंग गरम झाल्याचे जाणवले. रेल्वे अधिकार्यांनी प्राथमिक उपचारांची व्यवस्था केली. आज दुपारी एक वाजून 20 मिनिटांनी गाडी मिरजेत आली, तेव्हा जेवण, पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. रेल्वेने संकटकालीन स्थितीत केलेल्या मदतीबद्दल त्यांनी आभार मानले. 

कोल्हापुरातील तारळ्याचे नामदेव कांबळे पत्नीसह मुलगी अर्णवीला घेऊन मुबंईला दवाखान्यासाठी गेले होते. तेदेखील अडकले. रेल्वेच्या बसमधून कल्याण गाठले व तेथून विशेष गाडीने कोल्हापुरला निघाले. आणखी काही प्रवाशांनी मिरजेत फक्त पाणी घेतले. जेवण पुरेसे मिळाले, अन्य गरजूंना ते द्या अशी विनंती त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

कोल्हापूर येथे दवाखान्यासाठी आलेल्या सचिन सत्यनारायण या प्रवाशानेही रेल्वेच्या मदतीबद्दल आभार मानले, पण अन्य गाड्यांना मागे ठेवून ही विशेष गाडी कोल्हापुरात लवकर पोहोचू दे अशी प्रतिक्रिया दिली. 

मिरजेत 57 प्रवासी उतरले, कोल्हापूरचे 52 प्रवासी गाडीमध्ये होते. मिरजेतून गाडी 2.10 वाजता कोल्हापुरसाठी रवाना झाली. तिला विलंब होत असल्याचे पाहून काहींनी 1.50 ची पॅसेंजर पकडून कोल्हापूरला लवकर जाण्याचा प्रयत्न केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahalaxmi express reach in Miraj station special story