Maratha Kranti Morcha निमगाव-निघोज येथे एल्गार ; चक्का जाम

अमोल वाघमारे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

आमच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत आमचे सरकारशी असहकार पद्धतीने आंदोलन सुरु राहणार असून, आम्ही कोणतेही कर किंवा विज बिल भरणार नाही.

सावळीविहीर (जि.अहमदनगर) : सावळीविहीर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावरील निमगाव-निघोज येथील शिर्डी बायपास मार्गावर ' एक मराठा-लाख मराठा 'ची घोषणा देत मराठा समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन एल्गार करत रास्तारोको करुन चक्का जाम केला. सकाळी 9 वाजाता सुरु झालेले आंदोलन सरळ, शांततेच्या मार्गाने सुरु होते.

संपूर्ण राहाता तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन हातात भगवा ध्वज घेवुन सकाळी निमगाव-घोज(ता.राहाता)येथे आंदोलनाला राष्ट्रगीताने शांततेत सुरवात केली. या मराठा क्रांती मोर्चात आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या समाजसेवकांना दोन मिनटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पिंपळवाडी,शिर्डी येथून मोटारसायकल रॅली, ट्रॅक्टररॅली काढण्यात आली. मराठा बांधवांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी पंचक्रोषीतील भजनींमंडळांकडून भजनांचे आयोजन करण्यात आले. आंदोलकांना नाष्टा,चहा व जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी आंदोलकांनी निमगाव-निघोज येथील शिर्डी बायपास चौकाला मराठा क्रांती चौक असे नाव देण्याची एक मुखी मागणी केली. या मराठा आरक्षण आंदोलनात निमगाव, निघोज, शिर्डी, राहाता, पिंपळवाडी, पुणतांबा, रुई, नांदुर्खी आदी राहाता तालुक्यातील प्रमुख गावांमधील हजारोंच्या संख्येने तरुण उपस्थित होते.

आमच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत आमचे सरकारशी असहकार पद्धतीने आंदोलन सुरु राहणार असून, आम्ही कोणतेही कर किंवा विज बिल भरणार नाही. राहाता तालुक्यातील सर्व गावांमधील तरुण प्रांत कार्यालयासमोर ठिय्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचे मराठा मोर्चाचे सचिन चौगुले यांनी सांगितले.

विजय काळे,सचिन चौगुले,नाना खरात,कैलास कातोरे,शरद मते,विजय कातोरे,भाऊसाहेब रंगनाथ कातोरे,राकेश भोकरे,शिवाजी चौधरी,काका कातोरे,ताराचंद कोते,नाना बावके,सुहास वहाडणे,बाळासाहेब जपे,ओमेश जपे,वैभव कोते आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत आरक्षणाची मागणी केली. यावेळी केलेल्या रास्तारोकोमध्ये शिर्डीकडे येणारी व जाणारी वाहने रस्त्यावर थांबून होती. यावेळी शिर्डी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा उभारुन आंदोलनात चोख बंदोबस्त ठेवला.

Web Title: Maharashtra Bandh Maratha Kranti Morcha Nimgaon Nighoj Agitation