कऱ्हाडला २१ जणांच्या टोळीवरील मोक्कावर शिक्कामोर्तब 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

जुनेद शेख व त्याच्या टोळीत तब्बल २१ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.  

कऱ्हाड  : टोळीयुद्धातून येथे पवन सोळवंडे यांच्यावर गोळ्या झाडून त्याच्या करण्यात आलेल्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या जुनेद शेख व त्याच्या टोळीत तब्बल २१ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाईसाठी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरीक्त पोलिस अधिक्षक धीरज पाटील यांच्यामार्फत कोल्हापूर विभागीय विशेष पोलिस माहनिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यास विशेष पोलिस महानिरीक्षकांनी परवानगी दिली आहे. 

कऱ्हाड शहर हे पोलिस दरबारी संवेदनशील म्हणुन ओळखले जाते. शहरासह परिसरात गुंडांच्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये वर्चस्ववादातुन सातत्याने मारामारी, खुन, गोळीबार यासारख्या घटना घडत असतात. त्यामुळे शहरातील सामाजिक स्वास्थ्याला बाधा येत आहे. त्याचा विचार करुन सामाजिक स्वास्थ्यासाठी गुंडाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरीक्त पोलिस अधिक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन डीवायएसपी नवनाथ ढवळे व सध्याचे डीवायएसपी सुरज गुरव यांनी धडक मोहिम हाती घेतली आहे.

मध्यंतरी बुधवार पेठेतील पवन सोळवंडे याची मध्यरात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी जुनेद शेख व त्याच्या टोळीतील इतर संशय़ितांवर कारवाई केली. त्या टोळीतील तब्बल २१ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याला सध्या मंजुरी मिळाल्याने त्या टोळीवरील मोक्काच्या कारवाईवर शिक्कामोर्तब झाले आहे. 
 

अन्य गुंडांचे धाबे दणाणले- कऱ्हाडची गुंडगिरी संपवण्यासाठी स्वतः पोलिस अधिक्षक सातपुते यांनीच पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पोलिसांनी गुंडाची कुंडली जमा करुन त्यांच्यावर ठोस कारवाई सुरु केली आहे. त्यातच विशेष पोलिस महानिरीक्षकांनी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यासाठी मंजुरी दिल्यामुळे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अन्य गुंडांचे धाबे दणाणले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra control of organised Crime Act action to a group of 21 people in satara